मुरगूड : सोनाळी (ता. कागल) येथील वरद रवींद्र पाटील (वय ७) या बालकाचे अपहरण करून खून करणारा संशयित आरोपी मारुती ऊर्फ दत्तात्रय तुकाराम वैद्य याला फाशी झालीच पाहिजे, ही मागणी करत शिवाय आरोपी पोलिसांची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे तपास भरकटत आहे, असा आरोप करत विनाकारण वरदच्या आईला पोलिसांकडून त्रास दिला जात आहे. तो थांबवावा यासाठी शनिवारी सोनाळी आणि सावर्डे बुद्रुक येथील हजारो संतप्त ग्रामस्थांनी मुरगूड पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. स्टेशनच्या समोर चार तास ग्रामस्थांनी ठिय्या मांडला. वैद्यला फाशी द्या, आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
सोनाळी येथील वरद पाटील या बालकाचे त्याचे आजोळ सावर्डे बुद्रुक (ता. कागल) येथून १७ तारखेला अपहरण झाले होते. पोलिसांनी संशयित म्हणून वरदच्या वडिलांचा मित्र मारुती ऊर्फ दत्तात्रय तुकाराम वैद्य याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने अपहरण आपणच केले असून त्याच्या खुनाची कबुली दिली. लपवून ठेवलेला मृतदेहही पोलिसांनी ताब्यात घेतला. दरम्यान, वरदच्या नातेवाइकांनी अंधश्रद्धेतून हा प्रकार झाला असून हा नरबळी दिला असल्याचा आरोप केला होता, पण पोलिसांकडून खुनाचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.
सकाळी अकराच्या सुमारास सोनाळी गावातील संतप्त ग्रामस्थ पोलीस स्टेशनवर मोर्चाने आले. यावेळी पोलिसांनी त्यांना स्टेशनच्या दारातच रोखले. महिला आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी आरोपीला आमच्या ताब्यात द्या हीच मागणी लावून धरली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. शेवटी कोणाचेही न ऐकता आलेल्या सुमारे पाचशे महिला व पुरुषांनी स्टेशनच्या प्रवेश दारातच ठिय्या मांडला. गर्दी वाढू लागल्याने डीवाय.एस.पी. आर. आर. पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख तिरुपती काकडे, सपोनि विकास बडवे हे आंदोलनस्थळी दाखल झाले. सर्वांनी तपास योग्य दिशेने आणि निष्पक्षपातीपणे करण्याचे आश्वासन देऊनही ग्रामस्थ ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.
फोटो ओळ :-
वरद पाटीलचा खून हा अंधश्रद्धेतून झाला असून त्या दिशेने पोलिसांनी तपास करावा या मागणीसाठी सोनाळी व सावर्डे येथील संतप्त ग्रामस्थांनी काढलेला मोर्चा स्टेशनच्या दारात अडवून त्यांची अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, सपोनि विकास बडवे, किशोरकुमार खाडे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. चार तास स्टेशनसमोर ठिय्या मांडल्यानंतर काही महिलांना भोवळ आली, पण त्यांना बाजूला सावलीत नेले असता त्या ठिकाणीही त्यांनी असा आक्रोश केला.