हेरले : "कायरे तुला काय झालंय रे " असं स्मित हास्य करत रुग्णावर उपचार करणारे, रुग्णाची नाडी पकडताच रोगाचे निदान करणारे, शेकडो गोरगरिबांच्या हृदयसिंहासनावर आपले डॉक्टर म्हणून विराजमान असलेले हेरले येथील सुप्रसिद्ध डॉ. अरविंद लक्ष्मण नाईक म्हणजेच 'दादा'यांचे दि. २३ जानेवारी रोजी पहाटे वयाच्या ८४व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने हेरले पंचक्रोशीतील वैद्यकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.
गावातील भौतिक व सामजिक विकासामध्ये दोन वाड्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागतो. त्यामध्ये पाटलांचा वाडा व नाईकांचा वाडा. राजकीय सामाजिक स्तरावर पाटलांच्या वाड्याचे योगदान मोठे आहे. पण ज्या वाड्याने गावामध्ये १९७६च्या दरम्यान पहिला डॉक्टर दिला तो म्हणजे नाईकांचा वाडा. डॉ. नाईक यांची उपचार पद्धती प्रभावी होती. रुग्णांमध्ये आजारावर मात करण्याचा जागवलेला आत्मविश्वास हेच त्यांच्या प्रभावी उपचार पद्धतीचे गमक होते.
ज्यावेळी रुग्ण त्यांच्या दवाखान्यात जायचा तेव्हा त्यांच्या पाठीवर थाप पडली की औषधविनाच रुग्णांचा ५० टक्के आजार बरा व्हायचा. अल्पमोबदला,अचूक निदान, योग्य सल्ला यामुळे त्यांनी हजारो रुग्णांचा विश्वास मिळवला होता. ४० वर्षांच्या अखंड आरोग्यसेवेत एखाद्या रुग्णाला सलाइन लावल्याची वेळ क्वचितच आली असावी. वेळेला महत्त्व देणारे, शिस्तप्रिय आणि परखडपणे बोलणारे डॉ. नाईक यांचे वैद्यकीय क्षेत्रातील कार्य अविस्मरणीय असेच आहे.