पन्हाळा : मोठा गाजावाजा झालेला पन्हाळ्याचा पर्यायी रस्ता पाऊस व निधी यामुळे थांबला असून, मुख्य रस्त्याचे काम सुरू होण्यास अजूनही दहा दिवस जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सी.ए.ऐरेकर यांनी दिली.
पन्हाळ्याचा मुख्य रस्ता जुलैच्या अखेरीस अतिवृष्टीने झालेल्या भुस्खलनाने खचला. याला पर्यायी रस्ता बुधवारपेठमधून पावनगडच्या दिशेने जाणारी जुनी बैलगाडी वाट दुरुस्त करून मोटरसायकल व लहान चारचाकी गाड्या पन्हाळ्यावर येण्यासाठी करण्याचे पालकमंत्री यांचे पन्हाळा येथे झालेल्या ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीस झालेल्या आढावा बैठकीत ठरले, यावेळी आमदार विनय कोरे उपस्थित होते. या पर्यायी रस्त्याचा प्रस्ताव पन्हाळा गिरिस्थान नगर परिषदेने सादर केला. याला लागणारा खर्च केवळ वीस लाख रुपये मंजूर झाला; पण हा निधी अजूनही नगर परिषदकडे वर्ग झालाच नाही
दरम्यान, पर्यायी रस्ता वन विभागाच्या हद्दीतून जात असल्याने त्याला लागणारी परवानगी पालकमंत्री सतेज पाटील व आमदार विनय कोरे यांचे खास प्रयत्नाने मिळाली. रस्त्याचे कामही सुरू झाले; पण गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसाने या रस्त्यावर आणि पन्हाळकरांच्या आशेवर पाणी फिरवले असून, बुधवारपेठकडून पावनगडकडे जाणाऱ्या शेवटच्या शंभर मीटर रस्त्यावर प्रचंड दलदल निर्माण झाल्याने काम थांबले आहे. सध्या रस्त्याचे काम पन्हाळा नगरवासीयांची अडचण ओळखून ठेकेदार हर्षल पाटील यांनी केले असून, त्यांना निधी उपलब्ध झाल्यावरच केलेल्या कामाचे पैसे मिळणार आहेत.
मुख्य रस्त्याचे काम पुण्याच्या टेंसर कंपनीने घेतले आहे, ते सुरू होण्यास अजूनही दहा दिवसांचा कालावधी जाणार असल्याचे अभियंता सी.ए.ऐरेकर यांनी सांगितले. पन्हाळ्यावर चालत येणारे पर्यटक भेट देत असले तरी ही संख्या अत्यल्प आहे. सर्वच जण पर्यायी रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत, त्यामुळे पन्हाळ्याचे जनजिवन व आर्थकरण थोड्या प्रमाणात सुरू होईल.
फोटो------- पर्यायी रस्ता बुधवारपेठकडून असा तयार झाला.