कोल्हापूर, : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ५५ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी मंगळवार (दि. २४) पासून रंगणार आहे. जिल्ह्यातील पंधरा नाट्य संस्थांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला असून, सर्व नाटके रात्री दहा वाजता सादर होणार आहेत. पूर्वनियोजनानुसार या स्पर्धा शाहू स्मारक भवनमध्येच होणार आहेत. पहिल्या दिवशी तुकाराम माळी तालीम मंडळाच्या ‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकाने स्पर्धेला प्रारंभ होईल. पूर्वी स्पर्धेसाठी रात्री नऊ व अवि पानसरे व्याख्यानमालेच्या काळात दुपारी एक अशा वेळा ठरविण्यात आल्या होत्या. मात्र, दुपारी एकची वेळ दिलेल्या संघांनी यावर आक्षेप घेतला. त्यावर तोडगा म्हणून त्या सात नाटकांचे सादरीकरण दहा वाजता ठरविण्यात आले होते. मात्र, काही नाटके रात्री नऊ वाजता व काही दहा वाजता यातून प्रेक्षकांचा गोंधळ होऊ नये म्हणून सर्वच नाटके रात्री दहा वाजता सादर होणार आहेत. दरम्यान, सहभागी नाट्य संस्थांच्यावतीने स्पर्धेची जय्यत तयारी सुरू असून, रात्री उशिरापर्यंत नाटकांच्या तालमी चालू आहेत. संगीत, लाईट, नेपथ्य यांची जय्यत तयारी सुरू आहे. तालमीसोबतच वेशभूषा, रंगभूषेच्या तयारीची लगबग सुरू आहे. स्पर्धेमुळे रसिकांना दर्जेदार नाटके पाहण्याची संधी मिळणार आहे.
‘राज्य नाट्य’चे सर्व प्रयोग रात्री दहालाच
By admin | Updated: November 22, 2015 00:35 IST