आजरा तालुका हा राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून बालेकिल्ला आहे. पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असून तालुका संघ, जनता बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे.
साखर कारखान्यामध्येही १० संचालक राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारे आहेत. जिल्हा परिषदेमध्ये गेल्या १५ वर्षात आजऱ्याला संधी मिळालेली नाही. आजरा नगरपंचायत झाल्यामुळे यापुढे आजरा शहरातील कोणालाही जि. प. व पं. स.मध्ये जाता येणार नाही. यासाठी जयवंत शिंपी यांना जि. प. अध्यक्षपद मिळावे म्हणून कार्यकर्त्यांनी नेत्यांवर दबाव आणला होता. अखेर अध्यक्षपदाऐवजी उपाध्यक्षपदाची संधी शिंपी यांना मिळाली आहे. शिंपी यांनी यापूर्वी जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापती असताना आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे. आताही जिल्हा परिषद उपाध्यक्षपद मिळाल्याने आपल्या अभ्यासू नेतृत्वाची चुणूक ते दाखवतील, असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे. तसेच उपाध्यक्षपदाची आजरा तालुक्याला संधी मिळाली, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला पुन्हा एकदा भक्कम होण्यास मदत होणार आहे.
चौकट :
आजऱ्याला तिसऱ्यांदा उपाध्यक्षपदाची संधी
आजरा तालुक्याला जि. प.चे उपाध्यक्षपद यापूर्वी स्व. मुकुंददादा आपटे यांना अर्थ व शिक्षण समिती सभापतीसह, तर तालुक्याचे ज्येष्ठ नेते स्व. बळिरामजी देसाई यांना मिळाले होते. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते व विद्यमान जि. प. सदस्य उमेश आपटे यांना अध्यक्षपद मिळाले होते. आता शिंपी यांच्या माध्यमातून जि. प. उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.
'गोकुळ'ची संधी जि. प.मध्ये मिळाली
आजऱ्याचे जयवंत शिंपी म्हणजे स्व. खासदार सदाशिवराव मंडलिक व स्व. आमदार नरसिंगराव पाटील यांचे निष्ठावान कार्यकर्ते होय. 'गोकुळ'च्या निवडणुकीत आपल्याला किंवा मुलगा अभिषेक याला संधी मिळावी यासाठी जयवंतराव शिंपी समर्थकांनी भरपूर प्रयत्न केले. मात्र, नेत्यांनी थांबण्याचा सल्ला दिला. मात्र, नेत्यांनीच आगामी जिल्हा बँक, विधान परिषद, साखर कारखाना निवडणुकीसाठी बेरजेचे राजकारण करीत जि. प.मध्ये उपाध्यक्ष पदावर वर्णी लावून नाराजी दूर करण्यात यश मिळविले आहे.
---------------------
जयवंतराव शिंपी : १२०७२०२१-गड-०२