कणकवली : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काही बदल होणे अपेक्षित होते; मात्र ते झाले नाहीत. हेच नेतृत्व कायम राहिले तर विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसचा असाच पराभव होईल. त्यामुळेच आपली नाराजी प्रकट करण्यासाठीच आपण मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सांगितले. आता इथून पुढे मात्र आपण नेहमीच्या आक्रमक स्वभावानुसार वागणार आहोत, असे सांगत, विरोधक बेताल झाल्याने आता प्रत्येकाला जशास तसे उत्तर देणार, असा इशाराही त्यांनी दिला.राणे उद्या, सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. तत्पूर्वी, कोकणातील लोकांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी कोकणचा दौरा केला. या दौऱ्याचा समारोप आज, रविवारी कार्यकर्त्यांच्या स्नेहमेळाव्याने कणकवलीत झाला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांबाबत स्पष्टपणे उत्तरे दिली.महाराष्ट्रातील नेतृत्वाबाबत आपण नाराजी व्यक्त केली असली तरी मुख्यमंत्र्यांशी आपले वैर नाही. ते आपले मित्र आहेत; पण प्रश्न पक्षाचा आहे. लोकसभेत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्याला मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, मंत्रिमंडळ, आघाडीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी हे सर्वच जबाबदार आहेत. या पराभवानंतर पक्षात काही बदल होणे, परिवर्तन होणे अपेक्षित होते; मात्र ते झाले नाहीत. प्रशासकीय कामकाजात बदल व्हायला हवे होते; पण तसे काही घडलेच नाही. याच नेतृत्वाखाली काँग्रेस विधानसभा निवडणुकांना सामोरी गेली तर लोकसभेसारखाच दारुण पराभव होईल. या पराभवाची जबाबदारी आपल्यावर येऊ नये, यासाठीच आपण राजीनामा देत आहोत, असे ते म्हणााले.पक्षाच्या हायकमांडने तुमचा विश्वासघात केला का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, आपण विश्वासघात असा शब्द कधीच वापरलेला नाही. २००५ मध्ये आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यावेळी आपल्याला सहा महिन्यांत मुख्यमंत्री बनविण्याचा शब्द देण्यात आला होता. हा शब्द पाळण्यात आलेला नाही, एवढेच आपले म्हणणे आहे.सद्य:स्थितीत आपण फक्त आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देत आहोत. मात्र, आपण काँग्रेसमध्येच राहणार आहोत. त्यात काँग्रेसवर दबाव टाकण्याचा कोणताही हेतू नाही. आपल्याला देण्यात आलेला शब्द पाळला गेला नाही, याबद्दलची नाराजी आपल्याला मांडायची आहे. त्यासाठी हे माध्यम अवलंबिले आहे. एवढाच आपला राजीनामा देण्यामागील हेतू असल्याचे ते म्हणाले.गेली दोन वर्षे आपण कोणाच्याही टीकेला प्रत्युत्तर दिलेले नाही; मात्र आता विरोधक बेताल झाले आहेत. त्यांची तोंडे सुटली आहेत. त्यामुळेच आपण उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. यापुढे प्रत्येकाला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी राणे यांच्यासमवेत संदेश पारकर, विकास सावंत उपस्थित होते. (प्रतिनिधी) मुख्यमंत्र्यांकडून आपल्याला उद्या, सोमवारी सकाळी दहा वाजताची वेळ मिळाली आहे. त्यावेळी आपण त्यांच्याकडे राजीनामा देणार आहोत. ते आज, रविवारी दिल्लीमध्ये आहेत. त्यामुळे कदाचित वेळ मागे-पुढे होऊ शकते. आपण दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.माझ्याकडे कार्यकर्त्यांची फॅक्टरी आहेरवींद्र फाटक यांच्या शिवसेना प्रवेशावर राणे फार बोलले नाहीत. पावलापावलांवर आपण मदतीला कसे उभे होतो, याची जाणीव आता त्यांना (फाटकांना) होईल, एवढेच ते म्हणाले. फाटक यांच्या जाण्याने कोणतेही नुकसान होणार नाही. कारण माझ्याकडे कार्यकर्ते तयार करण्याची फॅक्टरी आहे. पुतळे जाळायची कामे शिवसेनेला दिली आहेतमहाराष्ट्रात आज ठिकठिकाणी आपले पुतळे जाळल्याच्या घटना घडल्या आहेत, असे छेडले असता ते म्हणाले, पुतळे जाळणे, बॅनर फाडणे, अशी निर्जीव गोष्टींशी निगडित कामे शिवसेनेला दिली आहेत. आपल्यासारख्या सजीवाला थेट येऊन भिडणे त्यांना जमत नाही, असा उपरोधिक टोलाही त्यांनी हाणला.काँग्रेस कल्चर स्वीकारले होतेआपला आक्रमक स्वभाव आणि काँग्रेस कल्चर यात फरक आहे. गेली नऊ वर्षे आपण स्वभावाला बगल देत काँग्रेस कल्चर स्वीकारलेच आहे. आता इथून पुढे मात्र आपण आपल्या नेहमीच्या आक्रमक स्वभावानुसार वागणार आहोत, असे सांगत राणे यांनी आपली पुढची दिशाच मांडली.पुण्य करणाऱ्यांनाच मन:शांतीराणे ज्या पक्षात राहतील तेथे त्यांना मन:शांती मिळो, या उद्धव ठाकरे यांच्या विधानावर जे पुण्य करतात त्यांना शांती मिळतेच. आपण दिलेल्या सणसणीत उत्तरामुळेच उद्धव यांची भाषा बदलली. म्हणूनच ते मन:शांतीची भाषा करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
मंत्रिपद सोडताच पुन्हा जुनी आक्रमकता
By admin | Updated: July 21, 2014 00:28 IST