कोल्हापूर : खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार घेतलेल्या रुग्णांचे तब्बल ६१ लाख ४७ हजार ४५० रुपयांचे बिल कमी करून देण्याची महत्त्वाची कामगिरी लेखापरीक्षकांनी बजावली आहे. यात शहरातील ५७ लाख ६६ हजार ८४१ रुपये व जिल्ह्यातील ३ लाख ८० हजार ६०९ रुपयांचा समावेश आहे.
एप्रिल महिन्यापासून कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू असून त्यामुळे पुन्हा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या एकाही रुग्णालयात आयसीयू, ऑक्सिजनचे बेड शिल्लक नाहीत, अशी स्थिती आहे. रुग्ण बरा झाल्यानंतर किंवा दगावल्यानंतर खासगी हॉस्पिटलकडून भरमसाठ बिल आकारले जाते. रुग्णालयांकडून नातेवाइकांची फसवणूक होऊ नये, त्यांची लूट होऊ नये यासाठी जिल्हा व महापालिका प्रशासनाने प्रत्येक रुग्णालयांसाठी ऑडिटरची नेमणूक केली आहे. रुग्णाला डिस्चार्ज देताना आकारण्यात आलेले बिल जास्त वाटत असेल तर त्याबद्दल नातेवाइकांकडून लेखापरीक्षकांकडे तक्रार केली जाते. तसेच लेखापरीक्षक देखील बिलांची फेरतपासणी करतात. शासनाने घालून दिलेल्या नियमांबाहेर जास्त रक्कम आकारली गेली असेल तर ती कमी करून दिली जाते. अशा रीतीने शहर व जिल्ह्यात मिळून गेल्या दीड महिन्यात ६१ लाखांच्यावर वाढीव बिल कमी करून देण्यात आले आहे.
कोल्हापूर शहरात सर्वाधिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल असून येथे उपचार घेणाऱ्या गंभीर व अतिगंभीर रुग्णांची संख्या जास्त असल्याने बिलाबाबत आलेल्या तक्रारींचे प्रमाणदेखील जास्त आहे.
--
आलेल्या तक्रारी
शहर : १ हजार ९८१ : कमी झालेले बिल : ५७ लाख ६६ हजार ८४१
जिल्हा : २०३ : ३ लाख ८० हजार ६०९
एकूण रुग्णालयांची संख्या : ८१
---
जिल्ह्यातील प्रमाण कमी
जिल्ह्यात ५० किंवा त्यापेक्षा जास्त खाट असलेल्या रुग्णालयांना कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी परवानगी देण्यात आली असून, या रुग्णालयांची संख्या २० इतकी आहे. काही रुग्णालयांमध्ये आयसीयू, ऑक्सिजन बेड नाहीत, चार पाच रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्ण दाखलच झालेले नाहीत. याठिकाणी लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केले जात असल्याने जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये वाढीव बिलांचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यासाठी १० लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
---
शासनाने घालून दिलेले दर असे (दिवसाला)
आयसीयू विथ व्हेंटिलेटर : ९ हजार
आयसीयू विनाव्हेंटिलेटर : ७ हजार ५००
जनरल वॉर्ड : ४ हजार
अन्य काही महत्त्वाच्या चाचण्या, आरटीपीसीआर, रेमडेसिविर, अतिगंभीर रुग्णांवरील औषधोपचार याबाबत रुग्णालये त्यांचे बिल लावू शकतात.
---