कोल्हापूर/ इचलकरंजी : इचलकरंजी येथील नवमहाराष्ट्र सूतगिरणीच्या व्याज सवलतीची रक्कम देण्यास राज्य बँकेने टाळाटाळ केल्याबद्दल सूतगिरणीचे अध्यक्ष राहुल आवाडे यांनी काल, शनिवारी मुंबईत केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नाची गंभीर दखल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली आहे. याबाबत बँकेच्या प्रशासकीय मंडळाची चांगलीच कानउघाडणी केली असून, येत्या चार दिवसांत या प्रकरणावर बैठक लावण्याची सूचनाही त्यांनी केल्याचे समजते. राज्यातील सहकारी सूतगिरण्यांना उभारी देण्यासाठी कर्ज थकबाकीसाठी राज्य शासनाने २००७ ला एकरकमी कर्ज परतफेड योजना आणली होती. थकबाकी कर्जावर १० टक्क्यांप्रमाणे व्याज आकारणी करावी, त्यातील तीन टक्के व्याज शासन अनुदान रूपात देणार, तीन टक्के व्याजाची रक्कम राज्य बॅँकेने सोसावी व उर्वरित ४ टक्के व्याजाची रक्कम संबंधित सूतगिरणीकडून वसूल करण्याचा शासन निर्णय झाला होता. शासन निर्णयाप्रमाणे नवमहाराष्ट्र सूतगिरणी व इंदिरा महिला सूतगिरणी या संस्थांनी कर्जाची रक्कम भरली. यातून ‘नवमहाराष्ट्र’ला एक कोटी ७९ लाख ७८ हजार व ‘इंदिरा महिला’ला १२ कोटी ८६ लाख ९६ हजार रुपये राज्य बॅँकेकडून येणे आहे. ही व्याज सवलतीची रक्कम मिळावी, यासाठी गेले चार वर्षे माजी मंत्री प्रकाश आवाडे व राहुल आवाडे प्रयत्न करीत आहेत; पण त्याला प्रशासक विजयकुमार अग्रवाल, सदस्य एस. जे. सहानी, कार्यकारी संचालक प्रमोद कर्नाड हे प्रतिसाद देत नाहीत. राज्य बँकेच्या एकाधिकारशाहीला कंटाळून राहुल आवाडे यांनी बॅँकेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत हाताची शिर कापून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर प्रशासक अग्रवाल व कार्यकारी संचालक कर्नाड यांनी राहुल आवाडे यांच्याशी चर्चा करून एक महिन्यात दोन्ही सूतगिरणींचा हिशेब करण्याची ग्वाही दिली.
प्रशासकांची मुख्यमंत्र्यांकडून कानउघाडणी
By admin | Updated: August 31, 2014 23:48 IST