संदीप बावचेजयसिंगपूर : हल्लीच्या स्पर्धात्मक युगात यूपीएससी उत्तीर्ण करणे मोठे आव्हान मानले जाते. परीक्षेसाठी खूप तयारी करावी लागते. हीच अशक्यप्राय गोष्ट जिद्दीच्या जोरावर जयसिंगपूर येथील अदिती संजय चौगुले (वय २७) हिने शक्य करून दाखविली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ६३ वी रँक मिळवून तिने दुसऱ्यांदा यश संपादन केले. गतवर्षी अदितीने ४३३ वी रँक घेऊन पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश संपादन केले होते.अदितीचे दहावीपर्यंत शिक्षण मालू हायस्कूल, बारावीचे शिक्षण जनतारा शिक्षण संकुल जयसिंगपूर, तर सांगलीच्या वालचंद कॉलेज येथे तिने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी घेतली. समाजशास्त्र विषयात उत्तीर्ण होऊन यूपीएससी परीक्षेची तयारी तिने सुरू केली होती. केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी (मुख्य) परीक्षा २०२३ च्या निकालानंतर गतवर्षी तिने ४३३ वी रँक घेऊन यश संपादन केले होते. मात्र, त्यावर न थांबता अदितीने वेळेचे योग्य नियोजन करून पुन्हा परीक्षेला सामोरे जाण्याची तयारी ठेवली. मंगळवारी परीक्षेचा निकाल लागला. यामध्ये देशभरात ६३ वे स्थान पटकावले. त्यामुळे आयएएस अधिकारी म्हणून ती आता कार्यरत होणार आहे. तिचे वडील शिरोळच्या श्री दत्त साखर कारखाना येथे उपअभियंता पदावर कार्यरत असून, आई गृहिणी आहेत.
स्वयं अध्ययनातून पहिल्या परीक्षेत मला यश मिळाले होते. मात्र, पुन्हा जिद्द व मेहनतीने अभ्यास केला. त्यामुळे मला आणखी चांगले यश मिळाले. स्वत:वर आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. त्यामुळे यशाचा मार्ग मोकळा होतो. ध्येयावर लक्ष केंद्रित करून अभ्यास करा. कोणतेही क्षेत्र अवघड नाही. -अदिती चौगुले, जयसिंगपूर.