म्हाकवे : मनोहर भोसले हे कितीही भासवीत असले तरी त्यांचे वर्तन हे वारकरी चौकटीत न बसणारेच आहे, शुद्ध वारकरी परंपरा जपणाऱ्या बाळूमामांच्या नावाने बाजार भरवू पाहणाऱ्या अशा तथाकथित सद्गुरूंना वेळीच रोखणे आवश्यक आहे. आदमापूर ग्रामस्थांनी जो ‘करेक्ट मनोहरी’ कार्यक्रम केला त्याचे आपण समर्थनच करीत असल्याचे पुणे येथील संत साहित्याचे अभ्यासक व कीर्तनकार हभप सचिन पवार महाराज यांनी केले.
सोनगे (ता. कागल) येथे चौंडेश्वरी मंदिरामध्ये परिवर्तन सामाजिक विकास संस्थेच्या तपपूर्ती वर्धापन दिनानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते.
हात पाहून भविष्य सांगणे हे वारकरी परंपरेत बसत नसल्याचे सांगत हभप पवार म्हणाले, संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांनी स्वतःला कधीही संत म्हणवून घेतले नाही. मात्र, सध्या बाह्य अवतार रंगवून सद्गुरू, संत असल्याचा आव अनेक बाबा-बुवा आणत आहेत. भोसले यांच्या बाबत बाळूमामाच्या भूमीतून झालेला उठाव कौतुकास्पद आहे.
यावेळी पंचक्रोशीतील भजनी मंडळे, तसेच वारकरी, भाविक, ग्रामस्थ उपस्थित होते.
‘लोकमत’चे कौतुक
मनोहर भोसले यांनी केलेले कारनामे लोकमत वृत्तपत्रातून जाहीरपणे मांडले. यामुळे संत परंपरेला लागणारे गालबोट थांबण्यासह भोळ्या भाविकांच्या होणाऱ्या लुबाडणुकीलाही आळा बसणार आहे. त्यामुळे ‘लोकमत’ने याबाबत घेतलेली भूमिका कौतुकास्पद असल्याचेही हभप सचिन पवार यांनी सांगितले.
सोनगे : येथील चौंडेश्वरी मंदिरामध्ये ग्रामस्थ व परिवर्तन सामाजिक विकास संस्था यांच्या वतीने आयोजित कीर्तन सोहळ्यात बोलताना हभप सचिन पवार.