शिरगांव : कोयना प्रकल्पाच्या अभियंत्यांच्या प्रयत्नातून कोयना जलविद्युत प्रकल्प स्तर १ व २ स्तर ३, व ४ कोयना धरण पायथा वीजगृह या प्रकल्पातून २००० मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येते. या प्रकल्पाची विभागीय व उपविभागीय कार्यालये स्थलांतरीत करण्याचा प्रस्ताव २७ फेब्रुवारी रोजी मुख्य अभियंता जलविद्युत प्रकल्प मुंबई यांच्या कार्यालयातून मंत्रालयामध्ये पाठवण्यात आल्याने स्थानिक जनता संतापली असून, सर्वपक्षीय आंदोलन उभारणार आहे.जलसंपदा सचिव (ला. क्ष. वि.) मेंढेगिरी यांच्या आदेशाने प्रस्ताव तयार करण्यात आले असल्याची चर्चा कोयना प्रकल्प अधिकारी, कर्मचारी, सर्व पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थामध्ये होत आहे. कोयना धरण डावातीर वीजगृहाचे काम सुरु आहे. याची गती कमी आहे, याचे खापर स्थानिकावर फोडण्यात येत असले तरी याला अधिकारीच जबाबदार आहेत. कोयना प्रकल्पाचा पाचवा टप्पा शासन दरबारी प्रस्तावित आहे आणि त्याचे प्राथमिक स्वरूपातील कामही लवकरच सुरु होणार आहे. पायथा वीजगृहातून ४० मेगावॅट २ तर स्तर ५ मध्ये २०० मेगावॅट २ अशी ४८० मेगावॅट विजनिर्मिती होवू शकते. कोयना धरणाच्या अंतर्गत भागातील धबधब्यांच्या उंचीचा फायदा घेऊन आणखी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर असताना एका अधिकाऱ्याच्या नकारात्मक भूमिकेमुळे कार्यालये स्थलांतरित अथवा बंद करण्याचा प्रयत्न झाल्यास मोठा संघर्ष पेटेल.प्रकल्पातून निर्माण झालेल्या विजेचा प्रति युनिटचा दर १ रुपयापेक्षा कमी आहे. कोयना धरणाची उंची ५ फुटाने वाढविल्याने पाणी साठवण क्षमता १०५ टीएमसी झाली आहे. त्यामुळे पाऊस लांबल्यास सिंचनासाठी पाणी वापरता येते. प्रकल्पाच्या कार्यालयातून निघणारी कामे येथील स्थानिक ठेकेदार करत असल्याने त्यांना रोजगार उपलब्ध होत आहे. तसेच कोयना प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गावांना देण्यात येणाऱ्या नागरी सुविधांची कामे या प्रकल्पाकडून करुन घेतली जातात व ती मोठ्या प्रमाणावर करणे बाकी आहेत. कार्यकारी अभियंता, कोयना धरण व्यवस्थापन विभाग कोयनानगर हे कार्यालय बंद करणे व सातारा येथील अधीक्षक अभियंता कोयना उभारणी मंडळ कृष्णानगर सातारा हे मंडळ कार्यालय कायमस्वरूपी बंद करून त्यांच्या अधिपत्याखाली असणारे, कार्यकारी अभियंता उभारणी विभाग क्र. १ अलोरे व त्यांच्या अधिपत्याखालील उपअभियंता, वीज व वसाहत पुरवठा उपविभाग कोयनानगर, उपअभियंता, वीज व वसाहत पुरवठा उपविभाग क्र. १ अलोरे ता. चिपळूण उपअभियंता उभारणी उपविभाग क्र. २ (अ) अलोरे हे तीन उपविभाग व सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यासह यवतमाळ येथे स्थलांतरित करण्याबाबत मंत्रालय स्तरावर प्रस्ताव आले आहेत. संबंधित विद्युत विभागीय कार्यालयाची वीज बिलांची वार्षिक वसुली १६२.०० लक्ष इतकी आहे. (वार्ताहर)
स्थलांतरण झाल्यास तीव्र आंदोलन
By admin | Updated: March 11, 2015 00:12 IST