शिरोली : वेगात, मद्य प्राशन करून चुकीच्या पद्धतीने ट्रॅक्टर चालविणाऱ्या व रिफ्लेक्टरचा वापर न करणाऱ्या ट्रॅक्टरचालकांवर शिरोली पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. पोलिसांनी गुरुवारी शिये फाटा, सांगली फाटा येथे अशा ट्रॅक्टरचालकांवर कारवाई करीत १८ हजार रुपये दंड वसूल केला आहे.
दोन दिवसांपूर्वी शिये-कसबा बावडा रोडवरील हनुमाननगर येथे उसाच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीची धडक बसून सावर्डे येथील डॉक्टर राजलक्ष्मी जाधव-पाटील ही युवती जागीच ठार झाली होती. तसेच गेल्या चार दिवसांत शिरोली परिसरात एकूण तीन अपघात झाले होते. या तिन्ही अपघातांत तीनजण ठार झाले आहेत. या धर्तीवर सुरक्षेच्या दृष्टीने शिरोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी गुरुवारी सांगली फाटा व शिये फाटा येथे पोलीस पथके नेमून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीची तपासणी सुरू केली आहे. वाहनांचे पासिंग, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनांची स्थिती, चालकाने मद्यप्राशन केले आहे का ,अशा अनेक गोष्टींची काटेकोरपणे तपासणी करण्यात आली. यावेळी वाहतुकीच्या नियमांचे पालन होत नसलेल्या ट्रॅक्टर चालकांकडून सुमारे अठरा हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. तसेच पोलिसांकडून ट्रॉलींना रिफ्लेक्टर बसविण्यात आले. पोलिसांनी ही मोहीम कडक व व्यापक प्रमाणात राबविण्यास सुरुवात केली आहे.
कोट :
अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. यातच अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. याच धर्तीवर गुरुवारी शिरोली एमआयडीसी पोलिसांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालक व रिफ्लेक्टरचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. (सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले)
फोटो ओळी०३ शिरोली कारवाई
ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रेलरला रिफ्लेक्टर लावताना शिरोली पोलीस.