कोल्हापूर : महानगरपालिका घरफाळा विभागाच्या विरोधात अनेक निकाल गेले आहेत; परंतु जाणीवपूर्वक वरच्या न्यायालयात मुदतीत अपील करण्यात आलेली नाहीत. या प्रकरणांचा शोध करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी बुधवारी कॉमन मॅन संघटनेमार्फत महापालिकेकडे करण्यात आली.
कॉमनमॅनचे बाबा इंदूलकर, दुर्गेश लिंग्रस, अनिल घाडगे, महादेव पाटील अशा चौघांनी बुधवारी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, सहायक आयुक्त विनायक औंधकर यांची भेट घेऊन घरफाळा घोटाळा, न्यायालयातील प्रलंबित खटले या विषयावर चर्चा केली.
महानगरपालिका घरफाळा विभागाचे किती खटले न्यायालयात प्रलंबित आहेत, अशी विचारणा अगदी सुरुवातीसच बाबा इंदूलकर यांनी केली. तेव्हा विधी विभागाचे प्रमुख ॲड. तायडे यांनी २१० प्रकरणे प्रलंबित असल्याचे स्पष्ट केले.
घरफाळा विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ९० प्रकरणे वेगवेगळ्या न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे. जर विधी अधिकारी आणि घरफाळा विभाग यांच्यातील आकडेवारीत एवढा मोठा फरक कसा काय आहे. गेली सहा महिने आम्ही याचा पाठपुरावा करीत आहोत; परंतु नेमकी माहिती दिली जात नाही. परस्पर कोणी तडजोडी केल्या आहेत का, याला जबाबदार कोण अशी विचारणाही इंदूलकर यांनी केली.
सहायक आयुक्त विनायक औंधकर यांनी यासंदर्भात माहिती घेण्यासाठी घरफाळ्यातील सर्व अधीक्षक, तसेच वकील यांची बैठक आयोजित केली होती; परंतु वकील आले नसल्याने ही बैठक झाली नाही. मात्र, येत्या आठ दिवसांत किती खटले दाखल झाले, किती खटले निकालात लागले आणि किती प्रलंबित आहेत याची माहिती घेतली जाईल, असे सांगितले.
महापालिकेच्या विरोधात गेलेल्या खटल्यात काहीजण मुद्दाम वरील न्यायालयात अपील करीत नाहीत. ज्यांनी ज्यांना अपील केले नाही किंवा या प्रकरणाशी संबंधित आहेत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी इंदूलकर यांनी यावेळी केली.
प्रत्येक खटल्यानुसार माहिती, निकालनिहाय त्रुटी तपासण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त देसाई यांनी दिल्या.
(फोटो देणार आहे, घरफाळा या नावाने पाहवा.)