लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून राज्यातील सत्तेतील नेत्यांना त्रास देण्याचा एककलमी कार्यक्रम भाजपचा आहे. जरंडेश्वर साखर कारखाना विक्री राज्य बँकेने केली. त्याच्या झालेल्या दोन्ही चौकशीत काहीही निष्पन्न झाले नाही. तरीही ‘ईडी’मार्फत चौकशी लावून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्रास देण्याचा प्रयत्न असल्याची टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, भाजपच्या कार्यकारणी बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री अनिल परब यांच्या ‘सीबीआय’ चौकशीचा ठराव केला. एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकारणीत अशा प्रकारचा ठराव करणे, हे महाराष्ट्रातील पहिले उदाहरण आहे. राज्य सहकारी बँकेने रीतसर टेंडर काढून जरंडेश्वर साखर कारखान्याची विक्री केली. बँकेच्या कलम ८८ व निवृत्त न्यायाधीशांनी केलेल्या तपासणीत काहीही निष्पन्न झालेले नाही. राज्यातील मंत्र्याच्या स्वीय सहायकांना अटक करणे, त्यांची चौकशी करणे हे नवीन तंत्र भाजपने काढल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
लिंगनूर-मुद्दाळतिट्टा हा रस्ता तत्कालीन बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘हायब्रीड ॲन्युटी’ अंतर्गत सुरू केला. मात्र गेली अनेक वर्षे बंद आहे. या कामातील टक्केवारीने ठेकेदार हैराण आहे. या अंतर्गत झालेल्या राज्यातील रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाला असून, त्याची चौकशी करण्याची मागणी आपण केल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे भला माणूस
मंत्री असताना आपण ‘हायब्रीड ॲन्युटी’ अंतर्गत झालेल्या रस्त्यांच्या कामाची चौकशीची मागणी कशी करता? असे विचारले असता, मागील सरकारच्या काळात वृक्षलागवड, दुष्काळ व टँकरमध्ये भ्रष्टाचाऱ्याबाबत अनेक वेळा मंत्रिमंडळ बैठकीत आवाज उठवला. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भला माणूस आहेत. भाजप कसा गैरफायदा घेते, सत्तेसाठी कशी भीती दाखवली जाते, हे आज त्यांना कळले असेल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
पायऱ्यांवर बसावे लागल्याचे फडणवीसांना दु:ख
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांचा बोलवता धनी देवेंद्र फडणवीस हेच आहेत. १०५ आमदार असूनही विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसावे लागते, याचे दु:ख फडणवीस यांना आहे. पडळकर यांनी भान ठेवून बोलवे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
संभाजी ब्रिगेडच्यावतीने घोषणाबाजी
मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा, अधिवेशनात याबाबत निर्णय व्हावा, अशी मागणी करत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेच्या ठिकाणी घोषणाबाजी केली. मंत्री मुश्रीफ यांनीही मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, यासाठी आता दिल्लीवर धडक दिली पाहिजे, असे सांगत ‘चलो दिल्ली’च्या घोषणा दिल्या.
वेड्या बाईला सासर-माहेर सारखेच
फडणवीस सरकारच्या काळात आंबेअहोळ प्रकल्पाला गती मिळाल्याचे समरजित घाटगे सांगतात, यावर विचारले असता, मुख्यमंत्री कोण जरी असले तरी लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरावा केला. येथे श्रेयाचा प्रश्न नाही. लोकांचे जीवन सुखी झाले पाहिजे. टीका करणाऱ्यांना फार महत्त्व देऊ नका, वेड्या बाईला सासर-माहेर साखरेच असते, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.