लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरामध्ये चौथ्या दिवशी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या १०३ नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे ५७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. तसेच गावभाग पोलिसांनी ५६ जणांची ॲंटिजन तपासणी केली. त्यामध्ये दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या कारवाईमध्ये एका महिला डॉक्टरचा समावेश आहे.
कोरोना रुग्णसंख्या व मृत्यूसंख्या वाढत असल्याने जिल्ह्यात कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. असे असतानाही अनेक नागरिक सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडत आहेत. त्यांच्यावर गावभाग, शिवाजीनगर व शहापूर पोलिसांकडून दररोज कारवाई सुरू आहे. तरीही नागरिक फिरताना आढळत आहेत. बुधवारी मॉर्निंग वॉकसाठी फिरणाऱ्या १०३ जणांवर कारवाई केली.
चौकटी
५०० रुपयांची चिल्लर
मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ५०० रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. एका नागरिकाने चक्क ५०० रुपयांची चिल्लर देऊन दंड भरला. मात्र, ती चिल्लर मोजताना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याची दमछाक झाली.
फळविक्रेता निघाला पॉझिटिव्ह
कुरूंदवाड (ता. शिरोळ) येथून एक आंबे विक्रेता इचलकरंजी शहरातून कबनूरकडे आंबे विक्रीसाठी निघाला होता. त्याला गावभाग पोलिसांनी ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. त्याची ॲंटिजन टेस्ट करण्यात आली असता तो पॉझिटिव्ह निघाला.
फोटो ओळी
१९०५२०२१-आयसीएच-०४
इचलकरंजीत मॉर्निंग वॉकसाठी फिरणाऱ्या नागरिकांवर गावभाग पोलिसांनी कारवाई केली.