कोल्हापूर : संचारबंदी कालावधीत शहरासह जिल्ह्यात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या १९२३ वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यामध्ये सुमारे अडीच लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. त्यापैकी ११३ दुचाकीवर जप्तीची कारवाई करण्यात आली.
कोरोना प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जिल्हा पोलीस दलातर्फे रस्त्यावर बंदोबस्तासाठी उतरून थेट कारवाई केली जात आहे. पोलिसांनी शहरात नऊ ठिकाणी तर जिल्ह्याच्या प्रवेश मार्गावर नाकाबंदी केली आहे. या संचारबंदी कालावधीत रस्त्यावर विनाकारण फिरणार्या १९२३ वाहनांवर मंगळवारी दिवसभरात कारवाई केली. त्याच्याकडून २ लाख ४७ हजार रुपये दंड वसूल केला तर ११३ दुचाकी जप्त केल्या. याशिवाय विनामास्क फिरणाऱ्या १८१० जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून ६८ हजार रुपये दंड वसूल केला.