प्रशासकांच्या धोरणामुळे कर्मचार्यांचे झाले नुकसान जिल्हा बॅँक कर्मचारी युनियनचा आरोप
By admin | Published: May 14, 2014 12:45 AM2014-05-14T00:45:48+5:302014-05-14T00:46:00+5:30
कोल्हापूर : जिल्हा बॅँकेतील कर्मचार्यांना निवृत्ती वयापूर्वी दोन वर्षे अगोदरच निवृत्त केल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान प्रशासकांच्या
कोल्हापूर : जिल्हा बॅँकेतील कर्मचार्यांना निवृत्ती वयापूर्वी दोन वर्षे अगोदरच निवृत्त केल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान प्रशासकांच्या धोरणामुळे होत असल्याचा आरोप कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅँक एम्प्लॉईज युनियन व बॅँक एम्प्लॉईज युनियन यांनी प्रसिद्धीपत्रकातून केला आहे. कर्मचार्यांच्या प्रश्नाबाबत प्रशासन बेफिकीर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. बॅँकेचे कर्मचारी जी. के. गुजरे यांच्या शाळेच्या दाखल्यामध्ये दुरुस्ती असून ती दाखल्याच्या मागील बाजूस केली आहे. त्याप्रमाणे बॅँकेकडील रेकॉर्डमध्ये दुरुस्ती करणे गरजेचे होते; पण कर्मचार्यांच्या प्रश्नांबाबत चालढकल करणार्या व्यवस्थापक मंडळींनी याबाबत गुजरे यांनी वारंवार विनंती करूनही दुरुस्ती केली नाही. दोन्ही संघटनांनी हा प्रश्न उपस्थित केला. केवळ पाहतो, बघतो, अभ्यास करतो, अशी उत्तरे बॅँकेच्या प्रशासनाने दिली आहेत. ३१ मे रोजी निवृत्त होत असल्याची नोटीस प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी गुजरे यांना दिली आहे. याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता आता वेळ निघून गेल्याचे सांगण्यात आले. याबाबत युनियनने अनेक वेळा चर्चा केली; पण त्याला उत्तर दिले नाही. कर्मचार्यांबाबत बॅँक प्रशासनाची भूमिका बेफिकिरीची आहे. यामुळेच बॅँकेत असंतोष वाढीस लागला आहे. त्याचा स्फोट होण्याची शक्यता आहे. सर्व धोरणात्मक निर्णयांमध्ये व सर्व प्रश्नांमध्ये अंतिम मत देण्याचा अधिकार असणारे प्रशासक सर्व प्रश्नांवर केवळ स्मितहास्य करतात. त्यामुळे कर्मचार्यांचे बरेच प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप युनियनच्या वतीने करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)