लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथे एकमेव असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयात चार महिन्यांच्या कालावधीत ५० प्रसूती या प्रथमच सीझरच्या केल्याने तालुक्याच्या वाड्या-वस्त्यांवरील सर्वसामान्य रुग्णांना मलकापूर ग्रामीण रुग्णालय आधारवड ठरत आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशुतोष तराळ यांनी चार महिन्यांत रुग्णालयाचे रूपच पालटले असून, रुग्णालयाच्या कामकाजाच्या बाबतीत राष्ट्रीय मानांकनाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर मलकापूर ग्रामीण रुग्णालय असून, मार्गावर होणाऱ्या अपघातात गंभीर जखमी रुग्णांवर तातडीने उपचार केले जात आहेत. शाहूवाडी तालुका डोंगरकपारीत वसला आहे. येथील महिलांना प्रसूतीसाठी कोल्हापूर येथे जावे लागत होते. त्यामुळे सर्वसामान्य, गरीब रुग्णांची हेळसांड होत होती. डॉ. आशुतोष तराळ यांच्याकडे रुग्णालयाचा पदभार येताच त्यांनी रुग्णालयातच सीझरच्या प्रसूती करून रुग्णांना मोठा आधार दिला आहे. यामुळे अनेक गर्भवती माता व बालकांचे प्राण वाचले आहेत.
काही वेळा अत्यवस्थ असणाऱ्या गर्भवती माता यांच्यासाठी कोल्हापूर किंवा अन्य ठिकाणी नेण्याचे धोक्याचे ठरत होते. चार महिन्यांच्या कालावधीत एकही प्रसूतीसाठी रुग्ण कोल्हापूरला पाठविलेला नाही. रुग्णालयात दररोज २५० ते ३०० रुग्णांना तपासून उपचार केले जात आहेत. आठवड्यातून बुधवारी रक्तदाब तपासणी मोहीम राबविली जाते. शुक्रवारी डोळे तपासणी केली जाते. मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेतले जातात. डॉ. तराळ यांनी महिलांच्या ४०० प्रसूती व ५० सिझेरियन प्रसूती केल्या आहेत. मलकापूर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.