आजरा : वाढते शहरीकरण, पाश्चात्त्यीकरण, सौदर्य प्रसाधनांचा अतिरेकी वापर यामुळे भारतामध्ये प्रतिवर्षी ८० ते ९० हजार महिलांना कर्करोगाची लागण होत असून, याबाबत महिलांनी वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. बसवराज कडलगे यांनी केले.आजरा येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर येथे केदारी रेडेकर फौंडेशन व अॅस्टर आधार हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या प्रचंड उपस्थितीत ‘स्त्रियांना होणारे कर्करोग समज आणि गैरसमज’ या विषयावर डॉ. बसवराज कडलगे यांचा मार्गदर्शनपर कार्यक्रम झाला.श्रद्धा शिंत्रे यांनी स्वागत केले. श्रीमती अंजनाताई रेडेकर म्हणाल्या, महिलांच्या आरोग्याबाबत आजही अनास्था दिसते. काही आजार हे वेळीच उपचार झाल्यास बरे होण्याची शक्यता असतानाही केवळ उपचाराअभावी गंभीर रूप धारण करतात. या उद्देशाने प्रबोधनात्मक म्हणून हा कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले. आजरा येथे महाआरोग्य मेळावा लवकरच घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.डॉ. कडलगे यांनी महिलांच्या स्तनांच्या कर्करोगासह विविध प्रकारांची माहिती देऊन स्वतपासणी, त्यावरचे उपचार, आवश्यक दक्षता याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी कामिनी पाटील, सुनीता रेडेकर, नेत्रा टोपले, भैरवी सावंत, शीला सावंत, डॉ. अंजनी देशपांडे, सरिता कांबळे यांच्यासह महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
देशात वर्षात ८० हजार महिलांना कर्करोग
By admin | Updated: November 30, 2015 01:15 IST