संदीप बावचे - शिरोळ ,, तालुक्यातील कृष्णा नदीपात्रातून वाळू उपसा करण्यासाठी तब्बल ८० प्रस्ताव तहसील कार्यालयास प्राप्त झाले आहेत. वाळू तस्करीचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरवाडसह नदी पलीकडील सात गावांतून सर्वांधिक प्रस्ताव आले आहेत. वाळू उपशाच्या परवानगीसाठी ग्रामसभेचा ठराव आवश्यक असल्याने तो मंजुरीचा प्रयत्न १५ आॅगस्टला होणाऱ्या ग्रामसभेत ठेकेदारांकडून होणार आहे.जिल्ह्यात वाळूचे केंद्र म्हणून शिरोळ तालुक्याला ओळखले जाते. कृष्णा नदीपात्रातील वाळू म्हणजे काळं सोनं म्हणून नावारूपास आले आहे. तालुक्यातून औरवाडसह गौरवाड, कवठेगुलंद, आलास, बुबनाळ, उदगाव, चिंचवाड, कोथळी, राजापूर, अकिवाट, खिद्रापूर, कवठेसार, आदी ठिकाणांहून वाळूचे प्लॉट काढले जातात. १२ लाखांपासून काही कोटींपर्यंत प्लॉटचे लिलाव बोलले जातात, असे असले तरी शिरोळ तालुक्यातील ठेकेदारांना वाळू तस्करी नवीन नाही. वाळूचा एक प्लॉट घ्यायचा व बेकायदेशीर अनेक प्लॉट सुरू करायचे यात ठेकेदारांचा हातखंडा आहे. चालू वर्षीतर वाळू तस्करांनी अक्षरश: नदी पात्रात बोटींचे तळच टाकल्याचे चित्र होते. वाळूचे प्लॉट बदलण्याचे प्रकारही अनेक ठिकाणी झाले होते. पावसाने दडी मारल्याने जास्त वाळू उपसा झाला. तसेच वाळू साठ्यांचे अनेक बेकायदेशीर साठे ठेकेदारांनी केले आहेत.आता नव्याने होणाऱ्या वाळू उपसा परवान्यासाठी तालुक्यातून तब्बल ८० प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे आले आहेत. हे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहेत. वाळू उपशाच्या परवान्यासाठी ग्रामसभेचा ठराव आवश्यक असल्याने तो मंजूर करण्यासाठी वाळू तस्करांचा प्रयत्न असणार आहे.चालू वर्षी तहसीलदार सचिन गिरी यांनी कारवाईची मोहीम राबविली होती. जवळपास ५० हून अधिक बेकायदेशीर वाळू आवट्या उदध्वस्त केल्या होत्या. प्रशासनाने वाळू तस्करांच्या चांगल्याच मुसक्या आवळल्यामुळे घालवाड, खिद्रापूर यासह अनेक ठिकाणाचे वाळूचे प्रस्ताव महसूल प्रशासनाकडे आले आहेत.विरोधाची गरज‘लिलावाची रक्कम लाखात, मात्र रस्त्याचे नुकसान कोटीत’, अशीच परिस्थिती वाळू वाहतुकीमुळे दरवर्षी होते. शिवाय वाळू उपशामुळे नदी प्रदूषणाचा प्रश्नही उद्भवतो. त्यामुळे वाळू उपशाच्या ठरावाला ग्रामसभेत विरोध करण्यासाठी नागरिकांची मानसिकताही बदलण्याची गरज आहे.
वाळू ठेकेदारांचे ८० प्रस्ताव प्रतीक्षेत
By admin | Updated: August 1, 2014 23:19 IST