कुरुंदवाड : शहराच्या विकासासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून चार कोटी व आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडून तीन कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शहरातील रस्ते व गटारीचे बांधकाम करण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक प्रभागांत वीस लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड यांनी पत्रकारांना दिली.
ते म्हणाले, पालिकेतील या सभागृहाच्या पहिल्या तीन वर्षांत निधी मिळाला नाही. त्यानंतर कोरोनामुळे निधी उपलब्ध झाला नसला तरी अखेरच्या टप्प्यात पालकमंत्री पाटील व आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांच्या प्रयत्नाने शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध होत आहे. शहरातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे शहर कृती समिती आंदोलन करत आहे. त्या आंदोलनाची लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही दखल घेतली असून महिना अखेरीस रस्ता डांबरीकरण सुरू केले जाणार आहे. मात्र, तात्पुरती खड्डे मुरुमाने भरले जात आहे. रस्त्याबरोबरच सांडपाणी वाहणारे गटारी बांधण्यात येणार असून या कामासाठी प्रत्येक प्रभागांत वीस लाखांचा निधी खर्च करण्यात येणार असल्याचे सांगून विकासकामांना गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक अक्षय आलासे, सुनील चव्हाण, पाणीपुरवठा सभापती जवाहर पाटील, नगरसेवक अक्षय आलासे, सुनील चव्हाण, फारूख जमादार आदी नगरसेवक उपस्थित होते.