तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी शनिवारी शांततेत ५८.७४ टक्के मतदान झाले. एकूण २ लाख ६८ हजार २०४ मतदारांपैकी १ लाख ५५ हजार १८८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. सुरुवातीला मतदान संथ गतीने सुरू होते; मात्र अंतिम टप्प्यात चांगले मतदान झाल्याने मतदानाची टक्केवारी वाढली. बुधवार, दि. १५ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. एकूण २ लाख ६८ हजार २०४ मतदारांमध्ये १ लाख ३८ हजार १२ पुरुष, तर १ लाख २६ हजार १८८ स्त्री मतदारांचा समावेश असून, त्यापैकी ८३ हजार २९१ पुरुष व ७१ हजार ६५१ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तासगाव तालुक्यात १ लाख ४६ हजार ८२२ मतदारांपैकी ९० हजार ३६ मतदारांनी मतदान केले. तालुक्यात ६१.३२ टक्के मतदान झाले, तर कवठेमहांकाळ तालुक्यात १ लाख १७ हजार ३८२ मतदारांपैकी ६५ हजार १५२ मतदारांनी मतदान केले असून, त्याची टक्केवारी ५५.५० आहे. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत असून, त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून रिंगणात आहेत. त्यांना भाजपचे बंडखोर स्वप्नील पाटील यांच्यासह आठ अपक्षांनी आव्हान दिले आहे. या सर्व नऊ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. या निवडणुकीत सुमनताई पाटील यांच्यापुढे अन्य राजकीय पक्षांनी उमेदवार दिले नसल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली नाही. त्यामुळे मतदानाची टक्केवारी किती राहणार, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात होते, तरीही चांगले मतदान झाले. सकाळी आठ वाजता मतदानास शांततेत सुरुवात झाली. सायंकाळी पाचपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. दिवसभरात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.
तासगावात ५९% मतदान
By admin | Updated: April 12, 2015 00:48 IST