कोल्हापूर : निगवे खालसा (ता. करवीर) येथील शहीद जवान संग्राम पाटील यांच्या अवलंबितांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यातील ५० लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी ही आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले
काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील नौशेरा सेक्टर इथे पाक सैन्याबरोबर झालेल्या चकमकीत २१ नोव्हेंबरला ते शहीद झाले होते. संग्राम यांच्या अंत्यविधी वेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी संग्राम पाटील यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनामार्फत एक कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती. आमदार ऋतुराज पाटील यांनीही घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन करून तीन लाख रुपये मदतीचा धनादेश दिला होता. मुलांचे शिक्षण आणि भविष्यातील वाटचालसाठी डी. वाय. पाटील कुटुंबीय पाठीशी राहण्याची तसंच शासकीय मदत मिळवून देण्याचेही आश्वासन दिलं होेते. सैनिक कल्याण विभाग पुणे यांनी शासनास प्रस्ताव सादर केल्यानंतर शहीद जवान संग्राम शिवाजी पाटील यांच्या अवलंबितांना आर्थिक मदतीस मंजुरी दिली आहे.