खालगाव : रत्नागिरी तालुक्यातील संस्थान श्री देव गणपतीपुळे देवस्थानतर्फे १ एप्रिल २०१३ पासून सायंकाळी ७.१५ वाजता सुरु करण्यात आलेल्या ‘पुलाव’ या महाप्रसादाला भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. १ एप्रिल २०१५ रोजी या स्तुत्य व सेवाभावी प्रसादाच्या यशस्वी उपक्रमाला दोन वर्षे पूर्ण झाली असून, या दोन वर्षांच्या कालावधीत सुमारे ५ लाख ८४ हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला असल्याची माहिती देवस्थानचे सचिव विनायक राऊत यांनी दिली.प्रसिद्ध श्री देव गणपतीपुळे, संस्थान येथे दरवर्षी लाखो भाविक श्रींचे दर्शनासाठी येत असतात. गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री गणेश मंदिर, अथांग समुद्र, निसर्गरम्य वातावरण, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची निवास व्यवस्था, देवस्थानची रमाबाई पेशवे निवास व्यवस्था, विविध हॉटेल्स, घोडागाडी, उंट, विविधांगी फोटोग्राफर्स, त्याचबरोबर देवस्थानतर्फे दुपारी १२.३० वाजता खिचडी महाप्रसाद अशा विविधांगी सोयी-सुविधांनी युक्त असलेल्या हे गणपतीपुळे पर्यटन क्षेत्राला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दुपारी १२.३० वाजता मिळणारी खिचडी प्रसाद व सायंकाळी ७.१५ वाजता मिळणारा ‘पुलाव’ महाप्रसाद याला भाविकांची, पर्यटकांची, स्थानिक ग्रामस्थांचीही उपस्थिती असते. महाराष्ट्रातील विविध भागातून येणारे पर्यटक, भारतातील व परदेशातीलही पर्यटक मोठ्या भक्तिभावाने या प्रसादाला अत्यंत शांतपणे रांगेत उभे राहतात. देवस्थान कमिटीने अतिशय उत्तम नियोजनात येथील खिचडी व पुलाव महाप्रसाद सुरु केल्याने येथील भाविकांनी, पर्यटकांनी, शैक्षणिक सहलीतील विद्यार्थी, शिक्षक, शासकीय स्तरावरील अधिकारी, पदाधिकारी यांनी संस्थान श्री देव गणपतीपुळे संस्थेला मनापासून धन्यवाद दिले आहेत. योजनेच्या यशस्वीतेसाठी सर्वांकडून मिळणाऱ्या सहकार्याचे स्वागत करण्यात येत आहे. (वार्ताहर)
५ लाख ८४ हजार भाविकांनी घेतला महाप्रसाद
By admin | Updated: April 4, 2015 00:16 IST