इचलकरंजी : गुंतवणुकीच्या तिप्पट कर्ज आणि गुंतवणुकीच्या रकमेवर ४० टक्के बोनस देण्याचे आमिष दाखवून हिम्बज हॉलीडेज (मुंबई) या कंपनीने सुमारे एक कोटी ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीसह १७ जणांवर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याने फसवणूक झालेल्यांनी जिल्हा पोलीसप्रमुखांकडे तक्रारी अर्ज दिला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद केला. संजय बाबरे (वय ४२, रा. कलानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, मुंबई येथील हिम्बज हॉलीडेज कंपनीच्या इचलकरंजीतील शाखेकडे माझ्यासह सुमारे ४०० जणांनी पैसे गुंतवले. कंपनीने कमीत कमी तेरा दिवस व जास्तीत जास्त ४०० दिवस पैसे गुंतविल्यास रकमेवर ४० टक्के बोनस देण्याची योजना, ऐश्वर्य प्राप्ती, पर्यटनातून टूर, पेट्रोल पॅकेज व मृदुहरी ट्रेड अॅँड इंडस्ट्रिज या कंपनीमार्फत तिप्पट कर्जे देऊ, अशा योजनांचे आमिष दाखवले होते. बाबरे यांनी आमिषाला बळी पडून जानेवारी २०१२ मध्ये मित्रमंडळी, नातेवाइक व ओळखीच्या ४८५ लोकांकडून एक कोटी ३० लाख ३१ हजारांची गुंतवणूक केली. ४०० दिवस उलटले तरी या कंपनीने भरलेली रक्कमही परत दिली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे बाबरे यांना लक्षात आले. त्यानुसार त्यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर बाबरे यांनी जिल्हा पोलीसप्रमुखांकडे तक्रारी अर्ज करून दाद मागितली.पोलीसप्रमुखांकडून अर्ज पोलीस ठाण्यात आल्यानंतर बाबरे यांना बोलावून घेऊन आज, बुधवारी तक्रार नोंदवून घेतली आहे. (प्रतिनिधी)पोलिसांची टाळाटाळसुमारे ५०० लोकांची या प्रकरणामध्ये फसवणूक झाली आहे. असे असतानाही पोलिसांनी तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर जिल्हा पोलीसप्रमुखांकडून आदेश आल्यानंतर तक्रार दाखल करून घेतली. तरीही ठाणे अंमलदार हवालदार गबाले यांनी या प्रकरणात काही नाही. तुम्ही छापू नका, असे म्हणत प्रसारमाध्यमांना माहिती देण्यास टाळाटाळ केली.
४८५ जणांना सव्वा कोटींचा गंडा
By admin | Updated: December 31, 2014 23:57 IST