बेळगाव : बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४६.७० टक्के मतदान झाले. सर्वाधिक ५५.११ टक्के मतदान बेळगाव ग्रामीण मतदारसंघांमध्ये झाले आहे. माजी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे.
या मतदारसंघात भाजपतर्फे मंगला अंगडी, काँग्रेसतर्फे सतीश जारकीहोळी, तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके यांच्यात तिरंगी लढत झाली आहे. मंगला अंगडी यांनी सदाशिवनगर येथे, तर शुभम शेळके यांनी महाद्वार रोड १२ नंबर शाळेत मतदानाचा हक्क बजावला.
या पोटनिवडणुकीसाठी शनिवारी सकाळी ७ ते सायंकाळी ७ दरम्यान मतदान झाले. कडक पोलीस बंदोबस्तात, तसेच कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करून सदर मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. बेळगाव शहरामध्ये सकाळी काही मोजकी मतदान केंद्रे वगळता अन्यत्र मतदारांचा तितकासा उत्साह दिसून आला नाही. शहराच्या मानाने ग्रामीण भागातील मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह पाहावयास मिळाला. ग्रामीण बहुतांश मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसत होत्या. मतदानासाठी विशेष करून महिला मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत होते. मोदगा (ता. बेळगाव) येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या ठिकाणी असणाऱ्या सखी मतदान केंद्राच्या ठिकाणी उभारलेली रंगीबेरंगी फुग्यांची कमान व सेल्फी बुथ मतदारांना आकर्षित करताना दिसत होते. मतदान झाल्यानंतर युवा मतदार सेल्फी काढताना दिसत होते.
या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्यात तिरंगी लढत होत असल्यामुळे या तीनही पक्षांचे कार्यकर्ते अधिकाधिक मतदान होण्यासाठी प्रयत्न करीत होते.
------------------------------
विधानसभा मतदारसंघ : झालेले मतदान एकूण टक्केवारी
बेळगाव उत्तर मतदारसंघ १,००,८६८ ४१.५७
बेळगाव दक्षिण मतदारसंघ १,०२,८०२ ४२.०३
बेळगाव ग्रामीण मतदारसंघ १,३४,५११ ५५.११
अरभावी मतदारसंघ १,०४,१३७ ४३.३९
गोकाक मतदारसंघ १,२६,३६९ ५०.५५
बैलहोंगल मतदारसंघ ८७,६१९ ४६.१५
सौंदत्ती-यल्लम्मा मतदारसंघ ९३,७५० ४६.१५
रामदुर्ग मतदारसंघ ९६,८६१ ४६.३९