भीमगोंडा देसाई कोल्हापूर : सधन समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यांत तब्बल ४३ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद शासनाच्या आरोग्य विभागाकडे आहे. या आकडेवारीनुसार सरासरी प्रत्येक महिन्याला चार बालके दगावली आहेत. सहा मातांचाही मृत्यू झाला आहे. यामुळे शासकीय आरोग्य सुविधांवर प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे. आरोग्य सुविधांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही अजूनही माता, बालकांचा मृत्यू कमी करण्यात अपयश आल्याचेही समोर आले आहे.प्राथमिक, उपकेंद्रातर्फे ग्रामीण भागातील आणि शहरात महापालिका आरोग्य केंद्रातर्फे गर्भवतींची आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा दिली जाते. दर महिन्याला तपासणी, उपचार आणि एक सोनोग्राफी मोफत केली जाते. जननी शिशू सुरक्षा योजनेतून गर्भवतींची ने-आण, वजन कमी असलेल्या बाळांवर विशेष उपचार मोफत दिले जातात. तरीही जिल्ह्यात माता, बालकांचेे मृत्यू कमी झालेले नाहीत.आतापर्यंत झालेल्या माता, बालक मृत्यू प्रकरणातील कारणांचा शोध आरोग्य प्रशासनाने घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये संबंधित गर्भवतींमध्ये असलेला रक्तदाब, गरिबीमुळे खासगीतील संदर्भ सेवा शेवटच्या टप्प्यात न परवडणे, मुदतपूर्व प्रसूती, शेवटच्या टप्प्यातील स्कॅनिंग, सोनोग्राफी खासगीत करणे गर्भवतींना परवडत नाही, अशी प्रमुख कारणे माता, बालक मृत्यू प्रकरणात समोर आली आहेत.
आबिटकरांची जबाबदारी वाढली..राज्याचे आरोग्य मंत्री कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे आहे. म्हणून भविष्यात तरी जिल्ह्यातील माता, बालकांचा मृत्यूचा आकडा शून्यावर येईल, अशी आशा, अपेक्षा अनेकांमध्ये वाढल्या आहेत.
नऊ महिन्यांत मृत्यू झालेल्या बाळांची संख्या तालुकानिहाय अशी :गडहिंग्लज : ०८पन्हाळा : ०७शिरोळ : ०६भुदरगड : ०५करवीर : ०४शाहूवाडी : ०४राधानगरी : ०३हातकणंगले :०२कागल : ०२आजरा : ०१चंदगड : ०१गगनबावडा : ००
कागलला ३ मातांचा मृत्यूगडहिंग्लज, हातकणंगले, राधानगरी तालुक्यात प्रत्येकी एक आणि कागल तालुक्यात तीन मातांचा मृत्यू गेल्या नऊ महिन्यांत झाले आहेत. नऊ तालुक्यांत एकही मातांचा मृत्यू झाल्याची नोंद शासकीय आरोग्य यंत्रणेकडे नाही.
शासकीय आरोग्य यंत्रणेतर्फे माता, बालकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न असतो; पण मुदतपूर्व बाळंतपण, रक्तदाब अशा कारणांमुळे माता, बालकांचा मृत्यू होत असल्याचे निदर्शनास आले आहे. - डॉ. एफ. ए. देसाई, माता, बाल संगोपन अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर.