कोल्हापूर : शहरातील सर्व मिळकतींचे फेरसर्वेक्षण करण्यात येणार असून, नव्या वर्षात घरफाळ्यात ३५ ते ४० टक्क्यांची वाढ होणार आहे. नवीन रेडिरेकनरप्रमाणे ही घरफाळा वाढ होणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. घरफाळा वसुली अधिक प्रभावी आणि जास्तीत जास्त प्रमाणात व्हावी, या हेतूने हा विभाग सक्षम करण्याबरोबरच शहरातील सर्व मिळकतींचे फेरसर्वेक्षण करण्यात येणार आहे. पुढील महिन्यापासून या कामास सुरुवात होणार असून नव्या वर्षापासूनच ही नवीन घरफाळ्याचे वाढीव दर लागू होणार आहे. एप्रिलपासून एकही मिळकत घरफाळ्याशिवाय राहणार नाही, याची माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. शहरातील सर्व मिळकतींचे पाच वर्षांतून एकदा सर्वेक्षण करण्यात येऊन त्यावर घरफाळा आकारला जातो. जानेवारी महिन्यात पुन्हा शहरातील सर्व मिळकतींचे प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे. घरफाळा विभागाची वसुली जास्तीत जास्त व्हावी, कामात अधिक पारदर्शकता निर्माण व्हावी म्हणून सर्वेक्षणाचे काम खासगी ठेकेदारास दिले जाणार आहे. सर्वेक्षणाचे काम दीड ते दोन महिने सुरू राहील. त्यानंतर त्याचा डाटा एकत्रित केला जाईल. नवीन सर्वेक्षणानुसार १ एप्रिलपासून घरफाळ्याची आकारणी केली जाणार आहे. गेल्या काही वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आहेत, अपार्टमेंटस् उभारली गेली आहेत; परंतु विविध कारणांनी या मिळकतीच्या नोंदी महानगरपालिका घरफाळा विभागाकडे झालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर घरफाळ्याची आकारणी झालेली नाही. त्यामुळे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे; परंतु नवीन सर्वेक्षणात सर्वच मिळकतींवर घरफाळा आणि तोही योग्यप्रकारे आकारला जाईल, असे आयुक्त म्हणाले. सध्या ज्या मिळकती आहेत, त्यापैकी काही मिळकतधारकांनी वाढीव बांधकामे केली आहेत, त्याची रितसर परवानगी न घेताच ही बांधकामे झालेली आहेत. त्यामुळे त्या वाढीव बांधकामाच्या नोंदी आमच्याकडे नाहीत. मात्र, नवीन सर्वेक्षणात त्याच्या नोंदी घेण्यात येणार असल्याने ज्यांनी अशी बांधकामे केली आहेत, त्यांच्या घरफाळ्यात नवीन वर्षात वाढ होईल, असे आयुक्तांनी सांगितले. सध्या महानगरपालिकेकडे १ लाख ३० हजार मिळकतींची नोंद आहे. त्यापैकी निवासी वापराच्या एक लाख तर वाणिज्य वापरातील २५ हजार ६१२ तर उर्वरित चार हजारांवर औद्योगिक मिळकतींचा समावेश आहे. नवीन सर्वेक्षणात याची संख्या नक्कीच वाढलेली पाहायला मिळणार आहे तसेच घरफाळा विभागाची जमाही वाढलेली पाहायला मिळेल, असा आयुक्तांचा दावा आहे. (प्रतिनिधी)
घरफाळ्यात ४० टक्के वाढ!
By admin | Updated: December 10, 2015 01:27 IST