भीमगोंडा देसाई ल्ल कोल्हापूर-- जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायतींची मुदत मार्चमध्ये, नऊ ग्रामपंचायतींची मुदत जुलैत, तर ३८२ ग्रामपंचायतींची मुदत आॅगस्ट महिन्यात संपत असल्यामुळे आॅगस्ट महिन्यातच सर्वाधिक ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा बार उडणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील निवडणूक प्रशासन आतापासून तयारीला लागले आहे. तसेच गावपातळीवरील राजकीय हालचालींनाही सुरुवात झाली आहे.ग्रामपंचायतींची निवडणूक प्रत्येक पाच वर्षांनी असते. सध्या जिल्ह्यात १०२९ ग्रामपंचायती आहेत. या सर्व ग्रामपंचायतींची निवडणूक मुदत संपल्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांत होत असते. राजकीय कारकिर्द करणाऱ्यांना ग्रामपंचायतीचा आखाडा अतिशय महत्त्वाचा असतो. ग्रामपंचायत सदस्यापासूनच राजकारणात प्रवेश केलेले भविष्यात आमदार, मंत्री, खासदार झाले आहेत. त्यामुळे बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये अतिशय चुरशीने आणि प्रतिष्ठेने लढती होत असतात. अटीतटीची लढत असल्यास उमेदवार पैसे खर्च करण्यासाठी हात ढिले सोडतात. परिणामी, पुढे मुदत संपण्याआधी सहा महिन्यांपासून संबंधित ग्रामपंचायतींमध्ये कुरघोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे.मार्च, जुलै आणि आॅगस्ट महिन्यांत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या गावांत इच्छुक उमेदवार प्रभागातील मतदारांशी संपर्क वाढवीत आहेत. बारशापासून निधनापर्यंतच्या सर्व कार्यक्रमांना ते हजेरी लावत आहेत. प्रभागात आरक्षण कोणतेही पडो; तयारी मात्र सुरू केली आहे. महिला आरक्षण पडल्यास पत्नीला; नाही तर आपण स्वत: रिंगणात उतरण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात येणारे इच्छुक सत्ताधाऱ्यांचा चुकीचा कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी धडपडत आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा गैरकारभार अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचत आहे. प्रसंगी वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांची मदत घेतली जात आहे. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडे गैरकारभारासंबंधीच्या तक्रारी गेल्या दोन महिन्यांपासून वाढल्या आहेत. दरम्यान, मार्च महिन्यात चंदगड तालुक्यातील एक, तर जुलै महिन्यात शाहूवाडी तालुक्यातील एक, आजरा तालुक्यातील सात ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. जुलै ते डिसेंबर २०१५ अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमधील प्रभाग रचना व आरक्षणाची प्रक्रिया १५ जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार प्रभाग रचना केली जाणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्हा निवडणूक प्रशासन जोरदार तयारीत व्यस्त आहे. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची पहिल्यांदा प्रभाग रचना होईल. आरक्षणाची सोडत काढण्यात येईल. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. १५ जानावारीपासून प्रभाग रचनेचे काम सुरू झाले आहे. आॅगस्टमध्ये सर्वाधिक ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम लागेल. -किरण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (महसूल)ग्रामपंचायतींची संख्या तालुकानिहाय अशी- करवीर ५३ कागल५२ पन्हाळा४१ शाहूवाडी३६ शिरोळ० हातकणंगले२०राधानगरी२०भुदरगड४५ गगनबावडा८ आजरा१९ गडहिंग्लज४८ चंदगड४०
आॅगस्टमध्ये ३८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका
By admin | Updated: January 19, 2015 00:24 IST