भीमगोंडा देसाई -कोल्हापूर केंद्र सरकारच्या ‘संसद आदर्शग्राम’ योजनेंतर्गत खासदारांनी दत्तक घेतलेल्या गावांत केंद्र आणि राज्य शासनाच्या तब्बल ३६९ योजना प्रभावीपणे राबविण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. जिल्ह्यातील राजगोळी खुर्द (ता. चंदगड), पेरीड, सोनवडे (ता. शाहूवाडी) या दत्तक गावांत प्रत्यक्ष कामांना १६ एप्रिलनंतर सुरुवात होणार आहे.संसद आदर्शग्रामअंतर्गत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजू शेट्टी यांनी पेरीड, कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी राजगोळी खुर्द, राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी सोनवडे गाव दत्तक घेतले आहे. या सर्व गावांचा प्राथमिक सर्व्हे करून सध्याची परिस्थिती काय आहे, याची माहिती घेण्यात आली आहे.कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या चार जिल्ह्यांतील दत्तक घेतलेल्या प्रत्येक गावातील प्रत्येक घटकाचा सर्वदृष्टीने विकास व्हावा यासाठी शासनाच्या सध्याच्या जिल्हा वार्षिक सर्वसाधारण १६३, विशेष घटक ७८, आदिवासी ३, राज्य शासन १००, केंद्र पुरस्कृत २५ अशा ३६९ विविध योजना व्यापकपणे प्राधान्याने या गावांत राबविण्यात येणार आहेत.संसद आदर्श गाव योजनेंतर्गत खासदारांनी दत्तक घेतलेल्या गावांत सर्व्हे आणि जागृतीचे काम पूर्ण झाले आहे. प्रशिक्षण दिल्यानंतर प्रत्यक्ष विकासकामांचा कृती आराखडा तयार केला जाईल. १६ एप्रिलनंतर प्रत्यक्ष कामांना प्रारंभ होईल. - बी. जे. जगदाळे, जिल्हा नियोजन अधिकारी
संसद आदर्श गावात ३६९ योजनांना प्राधान्य
By admin | Updated: March 9, 2015 23:49 IST