लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनाच्या प्रतिबंधात्मक वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्य खरेदीसाठी आमदार चंद्रकांत जाधव यांनी आमदार निधीतून ३६ लाख रुपयांचा निधी कोल्हापूर महानगरपालिकेस दिला. निधीचे पत्र मंगळवारी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे सुपूर्द केले.
राज्य शासनाने खास बाब म्हणून आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक यंत्रसामग्री व साहित्य खरेदीसाठी खर्च करण्यास सहमती दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने आमदार जाधव यांच्याकडे ऑक्सिजन सिलिंडर्स जम्बो, वॉर्ड सिलिंडर्स, ऑक्सिजन रेग्युलेटर्स, व्हायटल साइन मॉनिटर्स, फार्मास्युटिकल फ्रीज, व्हॅक्सिन बॉक्स, कोविड प्रतिबंधात्मक औषधी व साधनसामग्री व टॉसिलीझुमॅब इंजेक्शन या वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्यासाठी ३६ लाख रुपयांची मागणी केली होती. या साहित्य खरेदीसाठी आमदार जाधव यांनी आमदार निधीतून ३६ लाख रुपयांचा निधी महापालिकेस दिला. यावेळी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे उपस्थित होते.
फोटो क्रमांक - २७०४२०२१-कोल-चंद्रकांत जाधव
कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांनी आमदार निधीतून ३६ लाख रुपयांचा निधी कोल्हापूर महानगरपालिकेस दिला असून त्याचे पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले. यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे उपस्थित होते.