राम मगदूम। गडहिंग्लज
हिरण्यकेशी नदीकाठच्या गडहिंग्लज तालुक्यातील २६ गावांना पुराचा धोका आहे. त्यामुळे गावनिहाय आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात आली असून, संभाव्य पूरपरिस्थितीच्या मुकाबल्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. १९८३ ते २०१९ दरम्यानच्या काळात आलेले महापूर आणि दरवर्षी उद्भवणारी पूरपरिस्थिती विचारात घेऊन महसूल खात्याने गावनिहाय आराखडे तयार केले आहेत. पूरबाधित होणाऱ्या गावातील लोकप्रतिनिधी आणि स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या आराखड्यांचे वाचन करून त्यात दुरुस्त्यादेखील करण्यात आल्या आहेत.
कोरोना महामारीच्या काळात काही गावांतील प्राथमिक शाळांमध्ये संस्थात्मक अलगीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे आराखड्यात पूरग्रस्त नागरिक आणि त्यांच्या जनावरांसह पशुपक्ष्यांच्या निवाऱ्याची पर्यायी व्यवस्था यावरच भर देण्यात आला आहे. तसेच संभाव्य पूरपरिस्थितीमध्ये शासकीय यंत्रणेच्या मदतीसाठी स्वयंसेवकांची फौजदेखील गावोगावी तयार करण्यात आली आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थ्यांना दोन महिन्यांचे धान्य आगाऊ वितरित करण्यात आले आहे. तथापि, अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्भवल्यास पूरग्रस्तांच्या निवाऱ्याबरोबरच भोजनाची आणि जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था कशी करायची? याचे नियोजनही आराखड्यात करण्यात आले आहे.
या गावांना आहे पुराचा धोका
२०१९ मध्ये महापुराचा फटका बसलेल्या गडहिंग्लज शहरासह ऐनापूर, बेळगुंदी, इंचनाळ, हरळी खुर्द, हरळी बुद्रूक, गिजवणे, भडगाव, दुंडगे, जरळी, निलजी, हेब्बाळ, कानूल, हिटणी, खणदाळ, नांगनूर, अरळगुंडी, कडलगे, बसर्गे, महागाव, हुनगिनहाळ, मुत्नाळ, बड्याचीवाडी, मुगळी, इदरगुच्ची, नूल व शेंद्री या गावांना पुराचा धोका आहे.
प्रतिक्रिया
गडहिंग्लजकर कोणत्याही संकटात एकमेकांच्या मदतीला धावून येतात. त्यामुळे कोणत्याही आपत्तींचा सामना करणे प्रशासनाला सहज शक्य होते. तरीदेखील गतकाळातील पूरपरिस्थिती विचारात घेऊन संभाव्य पूर आपत्ती व्यवस्थापनाची गावनिहाय आराखडे तयार करण्यात आले आहेत. महसूल, पाटबंधारे, बांधकाम, पोलीस, महावितरण, एसटी आदी संबंधित खातेप्रमुखांची संयुक्त बैठकही घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, याची खबरदारी घेतली जात आहे.
- दिनेश पारगे, तहसीलदार, गडहिंग्लज
फोटो ओळी : गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथे पूर आपत्ती व्यवस्थापन आराखड्याचे वाचन करण्यात आले. या वेळी सरपंच पौर्णिमा कांबळे, मंडल अधिकारी आप्पा कोळी, ग्रामसेवक डी. बी. कुंभार उपस्थित होते.
क्रमांक : १७०६२०२१-गड-१०