कोल्हापूर : परमेश्वरावरील श्रद्धेमुळे मानवी जीवनातील निराशा दूर होते. मानवी जीवनात अडथळे येतात, त्यावेळी परमेश्वराच्या आराधनेतूनच त्याला योग्य मार्ग मिळतो, असा संदेश ख्रिश्चन धर्मगुरू डॉ. रेव्हरंड पीटर डेव्हिड सिल्वे (पुणे) यांनी दिला.हॅँडिकॅप व्यवसाय प्रशिक्षण व रोजगार उद्योग केंद्र, कोल्हापूर या अपंग प्रशिक्षण संस्थेतर्फे नागाळा पार्क येथील ई. पी. स्कूल कंपाऊंड मैदानावर आशीर्वाद आध्यात्मिक सभेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. त्यांचा इंग्रजीतील संदेश त्यांच्या पत्नी डॉ. जयश्री पीटर सिल्वे यांनी मराठीमध्ये अनुवादित करून सांगितला. ख्रिसमसनिमित्त अपंगांच्या मदतीसाठी तीन दिवसीय सभेचे आयोजन केले होते. यावेळी अडीच लाख रुपयांचा निधी संकलित झाला.डॉ. रेव्हरंड पीटर डेव्हिड सिल्वे म्हणाले, परमेश्वराचा आपल्याला पाठिंबा आहे, हे लक्षात ठेवून मानवासह अपंगांनीही कशाचीही काळजी करू नये. ज्याची परमेश्वरावर श्रद्धा असते, तो जीवनात कधीही निराश होत नाही. यावेळी माजी आमदार राजीव आवळे, जिल्हा परिषद सदस्या स्मिता आवळे, रेव्हरंड डी. बी. समुद्रे, रेव्हरंड आर. आर. मोहिते, बिशप संजय आढाव, पास्टर सुरेश माने, थॉमस स्किनर, विजय फिलिप, संजय रेणके, दयानंद लोंढे, के. पी. सोनवणे, श्रीकांत पठाणे, जीवन आवळे, पास्टर धीरज भंडारे, साजन साठे, रुबन लोखंडे यांच्यासह सांगली, मिरज, निपाणी, बेळगाव, इचलकरंजी, इस्लामपूर, कोडोली येथून दहा हजारांहून अधिक ख्रिस्ती बांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अपंगांसाठी अडीच लाख मदत जमा
By admin | Updated: December 12, 2014 23:37 IST