जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याचा मुख्य आधार असलेल्या राधानगरी तालुक्यातील तीन मोठ्या धरणात १ एप्रिल रोजी एकूण १९.४० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण क्षमतेच्या ५० टक्के हा साठा आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यात दोन टीएमसी घट झाली आहे. यावर्षी उन्हाचा कडाका प्रचंड वाढल्याने पाण्याची गरज वाढणार आहे. उपलब्ध पाणीसाठा अजून अडीच महिने पुरवावा लागणार आहे.
तालुक्यातील ही तीनही धरणे ऑगस्ट महिन्यातच पूर्ण भरतात. नोव्हेंबरपासून मागणीनुसार पाण्याचा विसर्ग केला जातो. १ एप्रिल रोजी काळम्मावाडी धरणात १२.५३ टीएमसी, राधानगरी धरणात ४.३३, तुळशी धरणात २.५४ टीएमसी इतके पाणी शिल्लक आहे. गतवर्षी याच तारखेला काळम्मावाडीत १४.८७, राधानगरीत ४.६६ व तुळशीत २.५३ टीएमसी पाणी शिल्लक होते. यावर्षी दोन टीएमसी पाणी कमी आहे. उन्हाचा वाढता कडाका पाहता पिकांसाठी पाण्याची गरज वाढणार आहे. उपलब्ध पाणी पावसाळा सुरु होईपर्यंत पुरवावे लागणार असल्याने त्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे.