रमेश वारके
बोरवडे : बिद्री साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या वाळवे खुर्द (ता. कागल) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी विद्यमान उपसरपंच भरत पाटील यांचा अपवाद वगळता पाटील गटाने सर्वच सदस्यांना संधी नाकारली आहे. ९ जागांसाठी १८ उमेदवार उभे आहेत. ६४ वर्षांची एकहाती निर्विवाद सत्ता असलेल्या बाबासाहेब पाटील यांच्या श्री शेतकरी ग्रामविकास आघाडीविरोधात जय हनुमान महाविकास आघाडी तयार झाली असून या महाविकास आघाडीत शिवसेनेचे संघटक नागेश पाटील यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग दोनमधून गटनेते उपसरपंच भरत पाटील व विरोधी बिद्री साखर कारखान्याचे संचालक जगदीश पाटील यांच्यात लढत होत आहे. बाबासाहेब पाटील गटाला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ गटाने आव्हान दिले आहे. त्यामुळे वाळवे खुर्दची ही राजकीय लढाई बाबासाहेब पाटील गट विरुद्ध मुश्रीफ गट अशीच होत आहे. ३ प्रभाग व ९ उमेदवार असलेल्या या निवडणुकीसाठी दोन गटांतील १८ उमेदवार रिंगणात असून २३०० मतदार आहेत. वाळवे खुर्द येथे १९५६ सालापासून पाटील गटाची निर्विवाद सत्ता आहे. बाबासाहेब पाटील यांच्या बरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य व कागलचे माजी उपसभापती भूषण पाटील हेही निर्विवाद विजयासाठी प्रयत्नशील आहेत. तर विरोधी गटातील विजयासाठी प्रकाश महिपत पाटील, शिवराज पाटील, बिद्री कारखान्याचे संचालक जगदीश पाटील प्रयत्नशील आहेत.
चौकट करणे -
‘खा. प्रा. संजय मंडलिक गटाचे मोजकेच कार्यकर्ते येथे आहेत, तर माजी आ. संजयबाबा घाटगे गटाचे अस्तित्व येथे नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काही कार्यकर्ते आहेत. यांची मदत कोणाला मिळणार, हेही महत्त्वाचे आहे.’