कोपार्डे -- खुपीरे (ता. करवीर) येथील बलभीम सेवा संस्थेच्या नवीन केलेल्या २७४ सभासदांपैकी १७७ सभासदांना करवीर सहाय्यक निबंधक बाळासाहेब पाटील यांनी अपात्र ठरवले आहे. महसुली कागदपत्रे सादर केली नसलेने शेतकरी नसल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले असल्याचे निकाल पत्रात सहाय्यक निबंधकानी नमूद केले आहे.
खुपीरे येथील बलभीम सहकारी सेवा संस्था तालुक्यातील मोठा आर्थिक व्यवहार असणारी संस्था आहे. या संस्थेची स्वतःची मालकीची जमीन, अडत दुकान असे इतर व्यवहार आहेत. याच संस्थेच्या आठ संचालकांना आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या कारणावरून अपात्र करण्यात आले होते. यामुळे बलभीम सेवा संस्था चर्चेत आली होती.
या संस्थेचे ७५०च्या दरम्यान सभासद असून संचालक मंडळाने २७४ आणखी सभासद वाढ केली होती. याबाबत प्रकाश चौगले, सरदार बनगे गौतम पाऐ,सागर चौगले,भिकाजी पाटील यांच्याकडे दाद मागितली होती. यावर निर्णय देताना करवीरचे सहाय्यक निबंधक बाळासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र सहकार कायदा अधिनियम १९६० चे कलम ११ नुसार सभासद करून घेण्यात आलेल्या व्यक्ती कार्यक्षेत्रातील असल्या तरी गावकामगार तलाठी यांनी त्यांच्या नावे असणारा महसुली पुरावे म्हणून सातबारा दाखल केले नसल्याने २७४ पैकी १७७ सभासदांना अपात्र करण्यात आले आहे.