कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या सलग दोन लाटांमुळे एस.टी.महामंडळाचे आर्थिक गणित बिघडले आहे. यातून काहीअंशी महामंडळाची गाडी रुळावर येऊ लागली आहे. सध्या सणासुदीचा काळ असल्याने प्रवाशांचाही सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे. प्रवाशांचा कोरोनापासून बचाव व्हावा, याकरिता महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने १७५ बसेस ‘ॲन्टी मायक्रोबियल कोटींग’ अर्थात कोरोना फ्री केल्या आहेत. उर्वरित बसेसचे काम सुरू आहे. अनेकजण बसमध्ये बसल्यानंतर मास्कचा वापर करीत नाहीत. त्यामुळे प्रवाशांचा हा बेफिकिरपणा घातक ठरू शकतो. प्रत्येक बस दर दोन महिन्यांनी कोटींग केली जाणार आहे.
सर्वसामान्यांचा आधार म्हणून एस.टी.महामंडळाच्या बसेसकडे पाहिले जात होते. मात्र, कोरोनाच्या सलग दोन लाटांनंतर बसेसमधून प्रवास करण्याचे प्रवाशांनी टाळले. यासोबतच गर्दीमधून संसर्ग वाढू शकतो या कारणावरून राज्य सरकारने महामंडळासह प्रवाशांना निर्बंध घातले. त्यामुळे अनेक मार्गांवरील बसेस बंद झाल्या. सध्या गणेशोत्सव व येणाऱ्या काळात दसरा, दिवाळी आहे. कोरोनाचा प्रादुर्भावही कमी झाला आहे. त्यामुळे सर्वत्र नागरिक प्रवास करू लागले आहेत. महामंडळानेही खबरदारीचा उपाय म्हणून महामंडळाच्या सर्व बसेस ॲन्टी मायक्रोबियल कोटींग (कोरोना फ्री ) करून घेतल्या आहेत. कोल्हापूर विभागाकडे सध्या ७५० बसेस आहेत. त्यापैकी १७५ बसेसना हे कोटींग केले आहे. उर्वरित बसेसवर कोटींग करण्याचे काम कार्यशाळेत सुरू आहे. महामंडळ प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे जादा लक्ष देऊन अशा प्रकारे सुरक्षितता पाळत आहे. मात्र, यातून प्रवास करणारा प्रवासी वर्ग बेफिकीर बनला आहे. अनेकजण बसमध्ये बसल्यानंतर मास्क काढून ठेवतात. त्यामुळे सह प्रवासी जर बाधित असेल तर त्याचा संसर्ग होऊ शकतो, याचे भान बाळगत नाहीत. त्यामुळे यासाठी महामंडळाचे वाहक जनजागृती करीत आहेत.
सह प्रवाशांपासून धोका अधिक
महामंडळाने बसेस कोरोना फ्री केल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य निरोगी व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या धोका या बसेसमधून प्रवास करताना नाही. प्रवासानंतर प्रवासी व्यक्ती उठून गेल्यानंतर धोका नाही. पण बाजूला बसणाऱ्या बाधित व्यक्तीकडून धोका होऊ शकतो. त्याकरीता सह प्रवाशांनीही मास्क वापरणे सक्तीचे आहे. पण अनेकजण प्रवास करताना मास्क वापरताना दिसत नाहीत. बसमध्ये ५५ टक्के प्रवासी विना मास्क शेजारी शेजारी बसल्याचे चित्र मध्यवर्ती बसस्थानकात होते. विशेष म्हणजे वाहक मास्क तोंडाला लावा असे सांगत होता.
कोटींग झालेल्या बसेसची संख्या - १७५
आगार कोटींग झालेल्या बसेस
कोल्हापूर ५५
संभाजीनगर ३४
गारगोटी २८
मलकापूर २८
राधानगरी १५
आजरा १५
कोल्हापूर विभागातील ७५० बसेस पैकी पहिल्या टप्प्यात ४५२ बसेस कोरोना फ्री अर्थात ॲन्टी मायक्रोबियल कोटींग करण्याचे काम कार्यशाळेत सुरू आहे. प्रवाशांच्या आरोग्याचा विचार करून कोटींग केले जात आहे.
सुनिल जाधव,
यंत्र अभियंता, विभागीय कार्यशाळा, कोल्हापूर