प्रकाश पाटील - कोपार्डेगेल्या काही वर्षांपासून पावसाळा सुरू झाला की, जिल्ह्यातील गावात कावीळ, गॅस्ट्रो, तापाच्या साथीने लोकांचे आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची धावपळ व अशा साथी आटोक्यात आणण्यासाठी लागणारे श्रम यांची जुळवाजुळव करताना दमछाक होते. यासाठी मागील काही वर्षांचे सर्वेक्षण करून पावसाळ्याच्या आगमनाबरोबर आरोग्य खात्याने कोल्हापूर जिल्ह्यातील १३९ गावे अतिधोक्याची घोषित केली असून, त्यांच्यावर करडी नजर ठेवली आहे. गत दोन वर्षांपूर्वी इचलकरंजी येथे आलेली काविळीची साथ व यात अनेक लोकांचा झालेला मृत्यू त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेक गावांत गॅस्ट्रो, चिकनगुण्या, डेंग्यूमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. प्रभावी उपाययोजना राबविण्यासाठी राज्याच्या आरोग्य सचिव सुजाता सौनिक यांनी अतिधोक्याच्या गावांवर विशेष लक्ष द्या, ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या गावांमध्ये पावसाळ्यात साथीच्या विविध आजारांचा प्रचंड उद्रेक होतो, त्या गावांना अतिधोक्याची गावे म्हणून दरवर्षी घोषित केले जाते. अतिधोक्याची गावे विशेषत: नदीकाठची तसेच टीसीएल साठा कमी असणारी गावे आहेत. राज्यात २९ हजार ६०१ गावे आहेत. त्यापैकी तीन हजार ३९५ गावे ही अतिधोक्याची गावे म्हणून घोषित केली आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून या गावांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. गावांमधील पाण्याचा स्रोत तपासणे, इपिडेमिट कीट तैनात ठेवणे तसेच जिल्हा व तालुका पातळीवरील तातडीचे वैद्यकीय पथक कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील १३९ गावांमध्ये यासाठी पूर्वलक्षी प्रभावाने उपाययोजना करण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. आरोग्य विभागाकडून विशेष उपाययोजना राबविल्या जातात. त्यामुळे अतिधोक्याच्या गावांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे. तेथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात सर्वाधिक अतिधोक्याची गावे सातारा जिल्ह्यात आहेत. अकोला, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, जळगाव, ठाणे या जिल्ह्यांत सर्वाधिक अतिधोक्याची गावे आहेत, अशी माहिती आरोग्य खात्याच्या सूत्रांनी दिली. सातारा - २३७अकोला - २३६सिंधुदुर्ग - २३२अहमदनगर - २२३नांदेड - २००जालना - २०६भंडारा -१८२ठाणे - १७४सोलापूर - १७४सांगली - १७३लातूर - १६५गोंदिया - १४२कोल्हापूर - १३९चंद्रपूर - १२८पुणे - ११०
१३९ गावे आरोग्याच्या दृष्टीने अतिधोकादायक
By admin | Updated: July 21, 2014 00:24 IST