लोकमत न्यूज नेटवर्क
निपाणी : निपाणी नगरपालिकेत भाजपची सत्ता येऊन ६ महिने झाले आहेत. या काळात १० कोटी ४१ लाखांची कामे मंजुरी मिळाली असून, बहुतांशी कामे पूर्णत्वास गेली आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी दिली. पालिका कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या सहकार्याने ६ महिन्यांत केलेल्या सर्व कामांची यादी त्यांनी दिली. यावेळी उपनगराध्यक्षा नीता बागडे, नगरसेवक संतोष सांगावकर, नगरसेविका दीपाली गिरी, उपासना गारवे, विजय टवळे, दत्ता जोत्रे यांच्यासह नगरसेवक व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
जयवंत भाटले पुढे म्हणाले की, गेल्या ६ महिन्यांत निपाणी शहरात १५ व्या वित्त आयोगातून ३ कोटी ७१ लाख, १४ व्या आयोगातून ५ कोटी ७० लाख, १४ व्य वित्त आयोगातून १ कोटी, तर एसएफसी फंडातून ४ कोटींची विकासकामे सुरू केली आहेत. भीमनगर स्मशानभूमी, बसवाण माळ स्मशानभूमी जत्राटवेस स्मशानभूमी याठिकाणी पेवरब्लॉक, वीज, पत्रे, शेड अशी कामे सुरू आहेत, तर १५ व्या वित्त आयोगातून ४ कूपनलिकांची खुदाई केली असून, पाणी लागले आहे. यासाठी १४ लाखांचा खर्च आला आहे. जवाहर तलाव परिसरात अंतर्गत रस्ते, पथदीप, शेड वाळू अशी कामे केली असून, ही पूर्णत्वास गेली आहेत. नेहरू चौक येथे जलशुद्धीकरण केंद्र बसवले आहे. अशी एकूण १० कोटींवर कामे शहरात सुरू आहेत. प्रभाग क्रमांक ११, १०, २५ व २२ येथे सार्वजनिक शौचालय मंजूर झाले असून, प्रत्येकी १२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे, अशी माहिती जयवंत भाटले यांनी दिली.