कोल्हापूर : महावितरणकडे वीज बिल थकबाकीचा आकडा वाढतच चालला आहे. शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे या शाखेने १ कोटी १६ लाखांची बिले थकवली आहेत. बिल भरा नाही तर वीजपुरवठा खंडित करु अशी नोटीस काढण्याची वेळ महावितरणवर आली आहे. यात ४० गावे व वाड्यातील ५ हजार ४६२ वीज ग्राहकांचा समावेश आहे.
बांबवडे शाखेतील घरगुती ५ हजार ९६ घरगुती ग्राहकांकडे ८३ लाख ६५ हजार,वाणिज्यच्या २८८ ग्राहकांकडे १७ लाख ४१ हजार , औद्योगिकच्या ७८ ग्राहकांकडे १४ लाख ९२ हजारांची थकबाकी आहे. एकट्या बांबवडे गावातील ७८९ वीज ग्राहकांनी सर्वाधिक ३४ लाख ३४ हजार, डोणोली गावातील ३८५ वीज ग्राहकांनी १० लाख ३४हजार, साळशी गावातील ४०५ वीज ग्राहकांनी ७ लाख ५३ हजार रुपयांचे वीज बिल थकविले आहे.
यातील १९ वीज ग्राहकांकडे २५ हजारांहून अधिक तर ५ वीज ग्राहकांकडे ५० हजारांहून अधिक वीज बिल थकबाकी आहे. महावितरणकडून वीज बिलांची थकबाकी वसुली करण्याची मोहीम गतिमान करण्यात आली आहे. थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कठोर कारवाई करण्यात येणार आहे.