कल्याण: पश्चिमेकडील पारनाका परिसरात भाजपच्या पदाधिका-याला दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी १२ च्या सुमारास घडली. याप्रकरणी दोघा अनोळखी व्यक्तींविरोधात बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
येथील पारनाका परिसरात राहणारे भाजपचे पदाधिकारी हेमंत परांजपे ( वय ६४) हे लग्न समारंभ आटोपून शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास घरी परतत होते. त्यावेळी दुचाकीवरून दोघेजण तोंडाला रूमाल बांधलेल्या अवस्थेत त्यांच्याजवळ आले. काय रे लय माजलास काय, आमच्या दादाला शिव्या देतो काय, काहीपण बोलतोस काय? असे बोलून दोघांनी हेमंत यांना बेदम मारहाण केली. मारहाणीत खाली पडलेल्या हेमंत यांच्या दोन्ही पायावर सिमेंटच्या ब्लॉकने देखील जोरदार प्रहार केला आणि दोघे पसार झाले. परांजपे यांना झालेल्या मारहाणीचा प्रकार सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
अन्यथा तीव्र आंदोलन छेडूदरम्यान, परांजपे यांना झालेल्या मारहाणीचा निषेध भाजपने केला आहे. भाजपचे शहर अध्यक्ष वरूण पाटील यांच्या नेतृत्वाखाली पश्चिमेकडील अहिल्याबाई चौकातील भाजप कार्यालयाबाहेर रविवारी निषेध आंदोलन छेडण्यात आले. हाताला काळया फिती बांधून मारहाणीच्या घटनेचा निषेध करण्यात आला. १२ तासांच्या आत आरोपींना अटक केली नाही तर भाजप तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.