कल्याण : कल्याण पूर्व भागातील चिकणी पाडा परिसरातील सप्तशृंगी या धोकादायक इमारतीचा स्लॅब मंगळवारी दुपारी कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. सहा जण जखमी झाले. यामध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. प्रमिला साहू (५८), नामस्वी शेलार (२), सुनीता साहू (३७), सुजाता पाडी (३२), सुशीला गुजर (७८) आणि व्यंकट चव्हाण (३२) अशी मृतांची नावे आहेत, तर विनायक पाडी (४), शार्विल शेलार (४), अरुणा गिरनारायणा, यश क्षीरसागर (१३), श्रद्धा साहू (१४) आणि निखिल खरात हे जखमी झाले. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलिस आणि केडीएमसीचे अधिकारी यांनी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.
सप्तशृंगी नावाची चार मजली इमारत धोकादायक झाल्याने पालिकेने नोटीस बजावली होती. इमारतीत दुरुस्तीचे काम सुरू होते. मंगळवारी दुपारी १:४५ वाजता दुसऱ्या मजल्यावर स्लॅब कोसळल्याचा जोरदार आवाज झाला. आवाज होताच नागरिकांनी जीव मुठीत धरून बाहेर पळ काढला. इमारतीमधून सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्यकल्याणमध्ये इमारतीचे छत कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे ५ लाखांचे अर्थसहाय्य देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, जिल्हा प्रशासन त्यावर देखरेख ठेवून आहे, असेही त्यांनी सांगितले.
इमारत धोकादायक असल्याची नोटीस यापूर्वीच बजावली असल्याची माहिती सहायक आयुक्त सचिन तामखेडे यांनी दिली.