कल्याणामध्ये चैत्यभूमीची प्रतिकृती; बाबासाहेबांच्या अभिवादनासाठी आंबेडकरी अनुयायांची मोठी गर्दी

By मुरलीधर भवार | Published: December 6, 2023 03:20 PM2023-12-06T15:20:24+5:302023-12-06T15:21:06+5:30

कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांचे सौजन्याने झाला उपक्रम

Replication of Chaityabhoomi in Kalyan | कल्याणामध्ये चैत्यभूमीची प्रतिकृती; बाबासाहेबांच्या अभिवादनासाठी आंबेडकरी अनुयायांची मोठी गर्दी

कल्याणामध्ये चैत्यभूमीची प्रतिकृती; बाबासाहेबांच्या अभिवादनासाठी आंबेडकरी अनुयायांची मोठी गर्दी

कल्याण- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कल्याण पश्चिमेत दादर येथील चैत्यभूमीची प्रतिकृती साकारण्यात आली होती. आमदार विश्वनाथ भोईर यांच्या सौजन्याने आयोजित या उपक्रमामध्ये बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी कल्याण पश्चिमेसह आसपासच्या परिसरातील आंबेडकरी अनुयायांनी मोठी गर्दी केली होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी येतात. तर अनेकांना इच्छा असूनही काही न काही कारणास्तव दादर येथे जाणे शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला. कल्याण पश्चिमेच्या उंबर्डे येथील श्री कॉम्प्लेक्स चौकात तब्बल १६ बाय १६ फुटांच्या भागात चैत्यभूमीची ही भव्य अशी हुबेहुब प्रतिकृती साकारण्यात आली होती.

विशेष म्हणजे ५ डिसेंबरला रात्री १२ वाजता निघणाऱ्या कँडल मार्चची यंदापासून या चैत्यभूमीच्या प्रतिकृतीला आणि बाबासाहेबांना अभिवादन करून सुरुवात झाली. श्री कॉम्प्लेक्स चौकात सकाळी ११ वाजता आंबेडकरी समाजातील विविध मान्यवर, प्रतिष्ठित मंडळी यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी याठिकाणी आबाल वृद्धांची मोठी गर्दी झाली होती. तसेच दिवसभर अनेक जण याठिकाणी येऊन बाबासाहेबांना आदरांजली वाहून जात होते. कल्याण पश्चिमेला पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात आल्याबद्दल उपस्थित मान्यवर मंडळींनी आमदार भोईर यांचे विशेष आभार मानले.

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचेच दैवत असून त्यांना अभिवादन करणे आपले कर्तव्य आहे. त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात येता आले आहे. त्यामुळे त्यांच्या या महान कार्याला अभिवादन करण्यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न केल्याचे मनोगत आमदार भोईर यांनी यावेळी व्यक्त केले. या प्रसंगी माजी नगरसेवक जयवंत भोईर, प्रभूनाथ भोईर, मोहन उगले, वैशालीताई भोईर, छायाताई वाघमारे, पुष्पा भोईर, नेत्रा उगले यांच्यासह निवृत्त पोलीस अधिकारी रविंद्र तायडे, रमेश साळवे, एम.एस. हजारे, साहेबराव मगरे, निर्मल कुमार कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Replication of Chaityabhoomi in Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.