लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : येथील योगीधाम परिसरातील ‘अजमेरा हायइट्स’ या सोसायटीतील रहिवासी अभिजीत देशमुख यांना गुंड आणून मारहाण करणारा मुख्य आरोपी अखिलेश शुक्लासह तीन जणांना पोलिसांनी अटक केली. शुक्लाला अटक केली नाही, तर शनिवारी कल्याण बंद करण्याचा इशारा मनसेने दिला होता.
शुक्लाला अटकेसाठी विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेतली होती. पोलिस शुक्लाच्या मागावर होते. शहाड-टिटवाळादरम्यान त्याला अटक केली. त्या आधी शुक्लाने व्हिडीओ व्हायरल करून आपल्यावरील आरोपांबाबत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्याने दावा केला की, हा वाद परप्रांतीय विरुद्ध मराठी नाही. वर्षभरापासून हा वाद एका चप्पल स्टँडवरून सुरू होता, तर शेजाऱ्याचे म्हणणे आहे की, शुक्लाने धूप जाळल्यामुळे धुराचा त्रास होतो.
शुक्लाविरोधात तक्रारी
शुक्ला कुटुंबीय मराठी माणसांना सातत्याने त्रास देते. त्यातून हा वाद झाला. सोसायटीतील नागरिकांच्या शुक्लाविरोधात तक्रारी आहेत. हल्ला झाला, तेव्हा त्याने रिव्हॉल्वर काढले होते. हे मुद्दे सोसायटीतील नागरिकांच्या तक्रारीतून, तसेच राजकीय पक्षाच्या शिष्टमंडळानी केलेल्या चर्चेतून निदर्शनास आले आहेत. ते तपासून त्याच्याविरोधात विविध कलमे लावली जातील.
पोलिसांची दिरंगाई?
आरोपी पोलिस ठाण्यात आला, तेव्हा त्याला पोलिसांनी अटक केली नाही. पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाईत दिरंगाई केली, या आरोपाविषयी उपायुक्त झेंडे म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी सहायक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्याकडे दिली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिरंगाई केल्याचे आढळून आल्यास कारवाई केली जाणार आहे. मुख्य आरोपी शुक्लाच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. अन्य आरोपींचाही शोध सुरू आहे.
शुक्लाविराेधात मला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करावा. तो मंत्रालयात कामाला आहे. त्यामुळे तो सोसायटीतील नागरिकांना धमकावतो. पोलिस ठाण्यात तो आला होता, तेव्हा त्याला व्हीआयपी ट्रिटमेंट दिली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली नाही. शुक्लाला कोणाचे पाठबळ आहे, याची माहिती उघड व्हावी. - अभिजीत देशमुख, जखमी तरुण
शेजारी मला खूप त्रास देत होते. एक वर्षापासून धूप जाळण्यावरून हा वाद आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. त्यात भांडण सुरू असल्याचे दिसत असून माझ्या पत्नीलाही मारहाण केली गेली. मला शिवीगाळ करण्यात आली. या वादाला मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असा रंग दिला जातोय. - अखिलेश शुक्ला, आराेपी, कल्याण.