लाेकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली : मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नांदिवली परिसरात एका सोसायटीत मराठी विरुद्ध अमराठीचा वाद उफाळून आला आहे. या सोसायटीत आयोजित केलेल्या सत्यनारायणाची पूजा आणि हळदीकुंकू कार्यक्रमाला अमराठींनी विरोध केला. त्याविषयी अपशब्द वापरले असल्याचा आरोप मराठी महिलांनी केला आहे. यावरून सोसायटीत गोंधळाची परिस्थिती उद्भवली. या गोंधळाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पनवेलमध्ये मराठी विरुद्ध परप्रांतीय अशा वादाच्या घटना समोर आल्या आहेत. नांदिवली परिसरात साईकमल छाया या इमारतीमध्ये २ फेब्रुवारी रोजी सत्यनारायणाची पूजा आणि हळदीकुंकू समारंभ होणार आहे. या कार्यक्रमाबाबत सोसायटीच्या नोटीस बोर्डवर लिहिण्यात आले होते.
‘अमराठी कुटुंबीयांचे असले प्रकार खपवून घेणार नाही... ’ सोसायटीतील अमराठी सदस्यांनी बोर्डचा फोटो काढून सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकला. त्याविषयी अपशब्द वापरले. त्यामुळे या सोसायटीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद झाला. सोमवारी रात्री या वादातून सोसायटीत मोठा गोंधळ झाला.सोसायटीतील मराठी महिलांनी सांगितले की, अमराठी कुटुंबीयांनी या कार्यक्रमाला विरोध केला. आम्हाला शिवीगाळ केली. मराठी माणसांबद्दल अपशब्द वापरले. अमराठी कुटुंबीयांचे हे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा सोसायटीतील मराठी कुटुंबीयांनी दिला आहे.
दोघांवर गुन्हा दाखलमानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांनी सांगितले की, संबंधित सोसायटीतील कमिटीमध्ये वाद आहे. साेसायटीतील महिला कार्यक्रम घेणार होत्या. त्यासाठी त्यांनी नोटीस बोर्डवर नोटीस लावली होती. कार्यक्रमाकरिता स्वखुशीने ५०० रुपये वर्गणी घेतली जाणार होती. यावरून वाद झाला. या प्रकरणी अनिल भट, चिराग लालन यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
अलिबागमधील मोहपाडा येथे भाडेकरू मराठी कुटुंबावर परप्रांतीयाकडून घर सोडण्यास दबाव
लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : परप्रांतीय महिलेकडून एका मराठी व्यक्तीला शिवीगाळ केल्याची पेणमधील घटना ताजी असताना मोहपाडा भोकरपाडा येथील हिरानंदानी सोसायटीत एका भाडेकरू मराठी कुटुंबाला परप्रांतीय कुटुंबाकडून त्रास दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत मनसेच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण शांत झाले. हिरानंदानी सोसायटीमध्ये एक मराठी कुटुंब भाड्याने राहत होते. या कुटुंबाचे सोसायटीमधील वास्तव्याचा करार संपला होता. मात्र त्या कुटुंबात छोटे मूल असल्याने घरमालकाने त्यांना राहण्याची आणखी मुभा दिली होती.
शिवीगाळ आणि भांडणमात्र सोसायटीतील परप्रांतीय चेअरमनने महिलेकडून रूम सोडण्यासाठी या कुटुंबावर दबाव टाकण्यात आला, असा आरोप आहे. याशिवाय या कुटुंबाशी भांडण करून मराठी माणसाची इथे राहण्याची लायकी नाही, असा वाद घालत त्यांना शिवीगाळ केल्याची या कुटुंबाचे म्हणणे आहे..
‘त्या’ महिलेचा माफीनामा या घटनेनंतर मनसेने परप्रांतीय कुटुंबाला जाब विचारला. यासंदर्भात मराठी कुटुंबाची माफी मागण्यास त्या परप्रांतीय महिलेला भाग पाडले. मराठी कुटुंबाने रसायनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.