कल्याण- जुन्या वादातून १० ते १२ तरुणांच्या टोळीने एका तरुणाचे राहत्या घरातून अपहरण केले. त्याला तलवारीच्या उलट्या बाजूने , हॉकी स्टिकने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शहराच्या पश्चिम भागातील वाडेघर परिसरात काल रात्री घडली आहे. मयूर शिवदास असे जखमी तरुणाचे नाव आहे.
माराहणीत मयूरला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे आम्ही पोलिसांना हप्ते देतो त्यामुळे आमचे पोलीस काही वाकडे करणार नाही अशी धमकी देखील मारहाण करणार्या टोळीने मयूरला दिली. घटनेनंतर हल्लेखोर तरुण पसार झाले आहेत. मारहाण करणारे तरुण हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे जखमी मयूर याने सांगितले आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस पुढील तपास करत असून फरार हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
वाडेघर परिसरात मयूर शिवदास हा तरुण आपल्या कुटुंबासह राहतो. याच परिसरात राहणाऱ्या काही तरुणांबरोबर त्याचे याधी वाद झाले होते. काल रात्री मयूर घरात जेवत असताना दहा ते बारा तरुण मयूरच्या घरात शिरले. त्यांनी मयूरला मारहाण करत घराबाहेर असलेल्या गाडीत टाकून नेले. जुन्या वादातून या तरुणांच्या टोळीने मयूरला बेदम मारहाण केली.
मयूरच्या कुटुंबियांनी तत्काळ खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. या टोळीने मयूरला मारहाण करुन पुन्हा कल्याण आधारवाडी परिसरात सोडून दिले. या मारहाणीत मयूरला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.