कल्याण : रिसेप्शनिस्ट तरुणीने गोकुळ झाच्या वहिनीच्या कानशिलात लगावली म्हणून त्याने मारहाण केली, असा आरोप झा कुटुंबाने केला तरी याबाबत अद्याप पोलिस ठाण्यात तक्रार केलेली नाही. मात्र या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, गोकुळने केलेल्या मारहाणीचे समर्थन नाही. पण, महिलेला शिवीगाळ करीत कानशिलात लगावणाऱ्या रिसेप्शनिस्टवर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली. सोमवारी कल्याणमध्ये खासगी क्लिनिकमध्ये घडलेल्या मारहाणीबाबत मुख्य आरोपी गोकुळ आणि त्याचा भाऊ रंजीत यांना कल्याण न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. शुक्रवारी कोठडीची मुदत संपत असल्याने दोघांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल. रिसेप्शनिस्टने केलेल्या मारहाणीबाबत कोणीही तक्रार केलेली नाही, असे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मराठी एकीकरण समितीने घेतली पोलिसांची भेटमराठी तरुणीला जीवे मारण्याच्या घटनेनंतर मराठी एकीकरण समितीने मानपाडा पोलिसांना निवेदन दिले. परप्रांतीयांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. कायदा व सुव्यस्था राखा, असेही निवेदनात म्हटले आहे.
अर्धवट व्हिडीओद्वारे निर्माण केला वादतरुणीला झालेल्या मारहाणीचे समर्थन कोणी करणार नाही. परंतु, तिने महिलेला केलेली शिवीगाळ आणि मारहाण चुकीची आहे. तिच्यावरही कारवाई झाली पाहिजे. काहींनी सीसीटीव्हीचा अर्धवट व्हिडीओ चालवून मराठी-अमराठी वाद निर्माण केला, त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी, यासाठी उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेणार असल्याची माहिती नागरी विकास सेलचे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नवीन सिंग यांनी ‘लोकमत’ला दिली.
अभिनेत्री जान्हवी कपूरनेही व्यक्त केला संताप रिसेप्शनिस्टला मारहाण झाल्याच्या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक झाला. अभिनेत्री जान्हवी कपूर हिनेदेखील यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. इन्स्टाग्राम स्टोरीत जान्हवीने लिहिलं, असं कोणतं संगोपन आहे की ज्यामध्ये पश्चाताप, अपराधीपणा किंवा मानवतेची भावना उरत नाही? तो तुरुंगात का नाही? हे लाजिरवाणं आहे आणि आपल्याला लाज वाटायला हवी की, अशी माणसं मोकाट आहेत. शिक्षा हवीच, कोणतेही कारण ग्राह्य नाही!, असे तिने लिहिले आहे.