डोंबिवली : डिजिटल युगात मोबाइल हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. लहान मुलांच्या बाबतीत मोबाइलचा वापर चिंतेचा विषय ठरला आहे. यामुळे दाऊदी बोहरा समाजाने मुलांना मोबाइलच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी १५ वर्षांखालील मुलांना मोबाइल वापरण्यास बंदी घातली आहे. मुलांनी मोबाइल न वापरण्याचा संकल्प केला आहे. अमाकीन मोहम्मदीया सोसायटीमध्ये २८०० दाऊदी बोहरा समाजाचे रहिवासी राहतात. त्यामध्ये सुमारे ३५० मुले-मुली १५ वर्षे वयोगटातील आहेत. त्यांनी डोंबिवलीतील जमाली सभागृह, सालेह सभागृह, इजी सभागृह आणि मुबारका शाळा येथे मुलांना एकत्र करत मोबाइलमुळे होणारे दुष्परिणाम सांगितले. आपल्या वडीलधाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत या मुलांनी मोबाइल न वापरण्याचा संकल्प केला.
उपस्थित विद्यार्थ्यांनी काय सांगितले?
मोबाइलच्या वापरामुळे माझी झोप पूर्ण होत नव्हती. माझे डोळे खराब होण्याची शक्यता होती. शारीरिक हालचाल होत नव्हती. वडिलधाऱ्यांनी मोबाइलचे दुष्परिणाम सांगितल्यानंतर यापुढे मोबाइलवर वेळ घालविण्यापेक्षा मैदानी खेळासाठी वेळ देईन, असे १३ वर्षीय फातिमाने सांगितले.
मोबाइलच्या वापरामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष है होत होते. मोबाइलचा वापर बंद केल्याने मला आता अभ्यासासाठी वेळ मिळत आहे. डोकेदुखीचा त्रासही कमी झाल्याचे आठवीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्याने सांगितले.
मोबाइलचा वापर बंद केल्यापासून मला रात्री शांतपणे झोप लागत आहे. मोबाइल वापरण्याचे सोडल्यापासून टिकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याकडे कल वाढल्याचे विद्यार्थ्यांन सांगितले.