मुरलीधर भवार, डोंबिवली: आगरी समाजातील लग्नात गायला जाणारा धवला हे ऐतिहासिक शास्त्र आहे. आपली भाषा, संस्कृती टिकविण्यासाठी नवीन पिढीपर्यंत धवला पोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नव्या काळातही धवल्याची परंपरा जतन करणाऱ्या चौघा धवलारिनींनी व्यक्त केला. डोंबिवलीत सुरू असलेल्या आगरी महोत्सवात शुक्रवारी सायंकाळी 'धवला-आगरी पौरोहित्य' या विषयावर धवल्याच्या इतिहासावर प्रकाश टाकण्यात आला. आगरी समाजाच्या लग्नातील परंपरा असलेल्या धवलाची गीते गात धवलारिनींनी महोत्सवातील वातावरण प्रसन्न केले. या कार्यक्रमात धवलारिन वासंती भोईर, अवनी पाटील, संगीता पाटील, कु. मनस्वी माळी यांनी भाग घेतला. अनुराधा पाटील व ज्योती पाटील यांनी चौघींनाही बोलते केले.
धवला हा ऐतिहासिक आहे. रुक्मिणी स्वयंवराच्या वर्णनातही धवलाचा उल्लेख आहे. आगरी समाजातील लग्नात धवला ही धार्मिक परंपरा होती. धवलातील प्रत्येक शब्दात ताकद आहे. मात्र, बदलत्या काळात समाजाच्या लग्नात इतर प्रांतातील संगीत कार्यक्रम सुरू झाला. नव्या पिढीने संगीताचा आनंद जरुर घ्यावा. पण लग्न सोहळा हा शुद्ध व पवित्र करावयाचा असेल, तर ऐतिहासिक शास्त्र असलेला धवला हा आवश्यक आहे, असे मत या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आले.
धवलारिन हिला आगरी समाजात पुरोहिताचा दर्जा देण्यात आला आहे. लग्नाच्या विधीत `चाऊल' दळून पहिली सुरुवात होते. त्यानंतरच्या विविध विधींनी लग्नसोहळा पार पडतो. पारंपरिक पद्धतीने झालेल्या आगरी विवाह सोहळ्याची आठवण मनात कायम कोरुन राहते, असे या धवलारिंनींनी मुलाखतीत सांगितले.
धवलारिन म्हणून नव्या पिढीतील मनस्वी माळी हिने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तिने सादर केलेल्या विविध धवल्यांना रसिकांनी पसंती दिली. वासंती भोईर, अवनी पाटील, संगीता पाटील यांचे पारंपरिक धवले दाद मिळवून गेले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया नायकार यांनी केले.
दरम्यान, आगरी महोत्सवात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमांमध्ये स्त्री शक्तीला स्थान देण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनापासून पाहुण्यांचे व्यासपीठावरील स्वागत आणि नियोजनामध्ये महिलांनी सहभाग घेतला.