कल्याण : उल्हास नदीपात्रात बदलापूर हेंद्रेपाडा येथे भराव टाकून नदीचे पात्र बुजवणाऱ्या सत्संग विहारला अंबरनाथच्या नायब तहसीलदारांनी १० कोटी १६ लाख १७ हजार १४१ रुपयांचा दंड ठोठावला. त्यामुळे नदीपात्रात मातीचा भराव टाकणाऱ्यांचे धाबे दणाणले. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती.
उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ‘मी कल्याणकर’ संस्थेचे प्रमुख नितीन निकम यांनी पदाधिकारी उमेश बोरगावकर यांच्यासह शिनगारे यांची भेट घेऊन नदीपात्रात भराव टाकल्याची तक्रार करीत कारवाईची मागणी केली होती. यासंदर्भातील वृत्त ‘लाेकमत’ने २ मे रोजीच्या अंकात प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत अंबरनाथचे नायब तहसीलदार अमित पुरी यांनी नदीपात्रात मातीचा भराव टाकणाऱ्या सत्संग विहारला दंड ठोठावला.
संस्थेचे भजनलाल रॉय यांना भराव टाकण्याचा आदेश दिले होते. त्यांनी ८ हजार ९१२ ब्रास माती, ११६ ब्राड दगड, ८३ ब्रास दगड पावडर टाकून प्रवाह बुजविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी यंत्र सामग्री वापरली. त्यांना १० कोटी १६ लाख १७ हजार १४१ रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश १६ मे रोजी दिले. ही दंडाची रक्कम आदेश निघाल्यापासून सात दिवसांच्या आत महसूल खात्याकडे जमा करावी अन्यथा रक्कम सक्तीने वसूल करण्याची कारवाई केली जाणार आहे, असे आदेशात म्हटले आहे.
या कारवाईमुळे ‘मी कल्याणकर’ संस्थेचे प्रमुख निकम यानी लोकमत, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांचे आभार व्यक्त केले. वालधुनी नदीतही मातीचा भराव टाकला जात आहे. याचीही शिनगारे यांनी दखल घेऊन कारवाईचे आदेश द्यावे, अशी अपेक्षा निकम यांनी व्यक्त केली.